रस्त्यात थुंकाल तर १५० रुपयांना मुकाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:00 AM2018-11-20T00:00:52+5:302018-11-20T00:00:57+5:30
सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रस्त्यावर थुंकणे, घाण करणे अथवा उघड्यावर शौच करणे सातारकरांना आता महागात पडणार ...
सचिन काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रस्त्यावर थुंकणे, घाण करणे अथवा उघड्यावर शौच करणे सातारकरांना आता महागात पडणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. नगरपालिकेच्या वतीने असे कृत्य करणाऱ्यांकडून जागेवरच १०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. मंगळवार, दि. २० पासून या मोहिमेस प्रारंभ होणार असून, अशा प्रकारची मोहीम हाती घेणारी सातारा पालिका जिल्ह्यातील पहिलीच पालिका ठरली आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानांर्तगत ज्या कुटुंबांकडे शौचालय नाहीत, अशा कुटुंबांना वैयक्तिक अथवा सामुदायिक शौचालय उपलब्ध करून शहरे हागणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे. या अभियानांर्तगत आता सार्वजनिक ठिकाणी घाण करणाºया, रस्त्यावर थुंकणाºया लघुशंका अथवा शौच करणाºया व्यक्तींकडून दंड आकारण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. तसे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने नगरपालिका व नगरपंचायतींना देण्यात आला आहे.
सातारा पालिकेनेही आता सार्वजनिक ठिकाणी घाण करणाºयांना दंड करण्याची कडक पावले उचलली आहेत. शासनाने केलेल्या वर्गवारीनुसार दंड आकारला जाणार आहे. मंगळवार, दि. २० पासून पालिकेकेडून या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत एखादा व्यक्ती रस्त्यावर थुंकताना अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करताना आढळून आल्यास त्याच्याकडून जागेवरच १०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाची पाच पथके मोहिमेसाठी गठीत करण्यात आली आहेत. त्यामुळे ज्यांना रस्त्यात थुंकावयाचे असेल अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करावयाची असेल अशांना खिशात पाचशे रुपयांची नोट ठेवूनच घरातून बाहेर पडावे लागणार आहे.
आरोग्य विभागाची पाच पथके
या मोहिमेसाठी नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने पाच पथके गठीत केली आहे. विभाग प्रमुख व तीन आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली साध्या वेशातील ही पथके शहरात विविध ठिकाणी कारवाई करणार आहेत. रस्त्यात थुंकताना अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करताना कोणी आढळला तर त्याच्याकडून जागेवरच शासन निर्णयानुसार दंड (स्पॉट फाईन) आकारला जाणार आहे. जर एखाद्याने दंड भरण्यास विरोध दर्शविला तर संबंधित व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंद केला जाणार आहे.
पुरावा म्हणून काढणार फोटो
एखादा व्यक्तीवर कारवाई करण्यापूर्वी आरोग्य विभागाच्या पथकाकडून संबंधित व्यक्ती रस्त्यात थुंकताना अथवा घाण करीत असताना फोटो काढला जाणार आहे. हा फोटो पुरावा म्हणून वापरला जाणार असून, त्याच्याकडून वर्गनिहाय दंड आकारला जाणार आहे.
असा असणार दंड
कृती/बाब नगरपरिषदा
अ/ब वर्ग क/ड वर्ग
रस्ते/ मार्गावर घाण करणे १८० १५०
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० १००
उघड्यावर लघुशंका करणे २०० १००
उघड्यावर शौच करणे ५०० ५००