पालकांची गळचेपी कराल तर माझ्याशी गाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:02+5:302021-06-11T04:27:02+5:30
सातारा : ‘खासगी शाळाचालकांनी, हेही दिवस लवकरच जातील याचा विचार करून, केवळ शैक्षणिक फी किंवा शैक्षणिक शुल्क दिले नाही ...
सातारा : ‘खासगी शाळाचालकांनी, हेही दिवस लवकरच जातील याचा विचार करून, केवळ शैक्षणिक फी किंवा शैक्षणिक शुल्क दिले नाही म्हणून पाल्याची आणि पालकांची अडवणूक करू नये. पालकांनीही आपली परिस्थिती असेल तर ज्ञानदान करणाऱ्यांना यथोचित सहकार्य करावे. मात्र कोणी शाळाचालक, या काळात पालकांची आणि पाल्यांची, शैक्षणिक शुल्काकरिता गळचेपी करीत असेल, तर त्याची आम्ही वेळीच दखल घेऊ,’ असा इशारा खासदार उदयनराजे भोसले प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.
खासगी शाळांच्या शुल्कांबाबत पालकांनी उभारलेल्या सातारा जिल्हा पालक संघाच्या चळवळीस आमचा पाठिंबा आहे, असे नमूद करून खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात पुढे म्हटले आहे की, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांसह त्यांचे पाल्य यांच्या संयुक्त प्रयत्नांतून खासगी शाळा या आपले नाव उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा वाटा अनन्यसाधारण आहे. तथापि सध्याचा काळ हा अत्यंत खडतर आहे. माणुसकी संपविणारा हा कोरोना काळ शिक्षणाच्या संबंधित सर्वांचीच परीक्षा पाहणारा आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी शिक्षकांना सर्वोच्च प्राधान्य देत संस्थेच्या व वेळप्रसंगी स्वतःच्या राखीव निधीमधून, शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मानधन-पगार वेळच्या वेळी करावेत. पालकांशी समन्वयातून आताची परिस्थिती समजून घेऊन, पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा.
सातारा जिल्ह्यात केवळ शैक्षणिक शुल्काकरिता पालकांना जोर-जबरदस्ती, अपमानित करणे किंवा निकाल राखून ठेवणे, पुढील वर्षांचा प्रवेश रखडवणे असले प्रकार होत असतील असे वाटत नाही. जर होत असतील तर ते त्वरित बंद करावेत. केवळ शुल्क दिले नाही म्हणून पाल्यांचे शैक्षणिक नुकसान करणे कोणालाच मान्य होणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्काकरिता आम्ही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, याबाबत अशी प्रकरणे हाताळण्यासाठी जलमंदिर पॅलेस येथील जनसंपर्क कार्यालयात पालकांनी संपर्क साधावा. योग्य तो तोडगा काढला जाईल, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात शेवटी नमूद केले आहे.
(उदयनराजे भोसले यांचा आयकार्ड फोटो वापरावा.)