मनधरणी आॅफर’ अन् ‘दमबाजी’सुद्धा!
By admin | Published: November 3, 2016 11:50 PM2016-11-03T23:50:00+5:302016-11-03T23:50:00+5:30
कऱ्हाड पालिका निवडणूक : आघाड्यांचे नेते अपक्षांच्या दारात
कऱ्हाड : येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत अनेकांच्या दांड्या गुल होतील, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात मात्र २४१ पैकी फक्त पाच अर्जच अवैध ठरले. अन् निवडणुकीच्या सारीपाटावर अपक्षांची मनधरणी सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांच्यावर विविध आॅफरचा वर्षावही सुरू आहे. तर त्याहीपुढे जाऊन काही उमेदवारांना अर्ज माघारीसाठी दमबाजी केली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कऱ्हाडच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. गत पालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांना धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित लोकशाही आघाडीने बाजी मारली. हा पराभव तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जिव्हारी लागणाराच होता. मात्र, मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत त्यांनी कऱ्हाडवर सुमारे १८00 कोटींच्या विकासकामांचा वर्षाव केला आणि विधानसभा निवडणुकीत याच कऱ्हाडकरांनी भरघोस प्रेम व्यक्त करीत पृथ्वीराज चव्हाण यांना ‘जनाधारा’ची भेट दिली. त्यामुळे जबाबदारी वाढलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत ‘जनशक्ती’ची मोट बांधत संपूर्ण पॅनेल आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीतही कऱ्हाडकर बाबांवर तेच प्रेम व्यक्त करणार का? हे पाहावे लागणार.
दुसरीकडे कऱ्हाडचे सलग चाळीस वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दिवंगत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे वारसदार ‘लोकशाही’वर विश्वास ठेवून रिंगणात उतरले आहेत खरे! पण त्यांना कशी‘बशी’ २२ उमेदवारांपर्यंतच मजल मारता आली आहे. भाजपने सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, स्वप्नील भिंगारदेवे आदींच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये ‘कमळ’ फुलविण्याचा मानस केला आहे. पण त्यांनाही नगराध्यक्षांसह पंधरा उमेदवारांनाच पक्षीय चिन्हावर रिंगणात उतरवणे शक्य झाले आहे. भाजपच्या या ‘एन्ट्री’ने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली आहे, हे मात्र नक्की. कऱ्हाड शहरात बस्तान बसवू इच्छिणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी भाजपशी हातमिळवणी करीत भाजपने उमेदवार न दिलेल्या ठिकाणी आपले अकरा उमेदवार कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीच्या माध्यमातून उतरवले आहेत. शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ काही प्रभागातच पोहोचला आहे. तर एमआयएमचा ‘पतंग’ मोजक्या प्रभागातच उडणार आहे. मनसेने आपले ‘इंजिन’ लोकशाहीच्या दारात नेऊन उभे केले आहे. तर मानवाधिकार पार्टीने निवडणुकीपूर्वीच आपला गाशा गुंडाळला आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर अपक्षांना चांगलाच ‘भाव’ आला आहे. पॅनेल टू पॅनेल उमेदवार उभे करण्यासाठी लोकशाही, भाजप, कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडी हे तिघेजण अपक्षांना पुरस्कृत करू इच्छित आहेत. त्यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. या उलट काही प्रभागांमध्ये तिरंगी तर काही प्रभागात दुरंगी लढतीची शक्यता दिसत आहे. येथे दुसरा जादा उमेदवार येऊ नये, ज्या आघाडीला उमेदवार मिळालेला नाही त्यांना उमेदवारच मिळू नये किंवा अपक्षांनी मते खाऊ नयेत, यासाठी ‘अर्थपूर्ण आॅफर’ही काहींना मिळत आहेत. ढ
कऱ्हाडच्या राजकारणात सुरुवातीपासूनच दंडनीती सुरू झाल्याची चर्चा आहे. जे अपक्ष उमेदवार माघार घ्यायच्या मन:स्थितीत नाहीत किंवा नकार देत आहेत, अशा उमेदवारांना दमबाजी सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे कऱ्हाडची निवडणूक अंतिम टप्प्यात आणखी काय वळणे घेणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. (प्रतिनिधी)