दुर्लक्षामुळे खांदेकऱ्यांचा पाय खोलात !
By admin | Published: August 31, 2014 10:14 PM2014-08-31T22:14:47+5:302014-08-31T23:30:13+5:30
अंबेदरे ग्रामस्थांची व्यथा : अरुंद पाणंद रस्त्यामुळे पार्थिवाची हेळसांड
सातारा : सातारा शहरालगत असलेल्या अंबेदरे (जाधववाडी-धनवडेवाडी) स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याकडे असलेल्या झुडपांच्या फांद्या रस्त्यावर आल्यामुळे व रस्ता अरुंद असल्यामुळे पार्थिव स्मशानभूमीकडे नेताना खांदेकऱ्यांना आधार शोधावा लागत आहे. पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी, गुडघाभर चिखल, भातखाचरे, पायवाट यामुळे अक्षरश: कसरत करत पार्थिव स्मशानभूमीकडे न्यावे लागते.
सातारा शहरापासून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर अंबेदरे (दरे बुद्रुक) हे गाव आहे. हे गाव जाधववाडी, धनवडेवाडी, मोरेवाडी, भोसलेवाडी, आवाडवाडी, मस्करवाडी, निकमवाडी अशा वाड्या-वस्त्यांचे मिळून आहे व दोन ग्रामपंचायतींत विभागले आहे. त्यामुळे प्रत्येक वाडीनिहाय वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. या सर्व स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताही नाही व खासगी जागेत अंत्यविधी केले जातात.
जाधववाडी व धनवडेवाडी येथे गेल्या वर्षी नवीन स्मशानभूमीचे बांधकाम झाले; परंतु या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अजूनही पाणंद रस्ता व पायवाटेचाच वापर करावा लागत आहे. पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याने भरलेले खड्डे व गुडघाभर चिखल असतो व दोन्ही बाजूंच्या झुडपांच्या फांद्या रस्त्यात आल्यामुळे पार्थिवाला आधार देतानाच खांदेकऱ्यांनाही आधार शोधावा लागतो. त्यातच या स्मशानभूमीकडे चारचाकी अथवा दुचाकी गाडी जात नसल्याने अत्यंसंस्कार करण्यासाठी लागणारे साहित्यही ग्रामस्थांना डोक्यावर न्यावे लागते. उन्हाळ्यात ओढा आटल्याने व स्मशानभूमीत पाण्याची पर्यायी सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना विहिरी किंवा इतरत्र जाऊन पाणी आणावे लागते. स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
पावसाळ्यात त्रेधातिरपीट...
स्मशानभूमीमध्ये वीज, पाणी, नातेवाइकांना उभे राहण्यासाठी निवारा या सुविधा नसल्यामुळे पावसाळ्यात त्रेधातिरपीट उडते. रात्रीच्या वेळी कंदील, बॅटरी, गॅसबत्तीच्या उजेडात रस्ता शोधावा लागतो. स्मशानभूमीकडे चारचाकी वाहन जात नसल्याने विधीसाठी लागणारे साहित्य डोक्यावरून न्यावे लागते. पाण्याची सोय नसल्याने याठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी, अशी मागणी होत आहे.