‘डेल्टा प्लस’च्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:05+5:302021-07-02T04:26:05+5:30
सातारा : कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत गंभीर रूग्णांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मृत्यूंचा आकडाही जास्त दिसून आला. ...
सातारा : कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत गंभीर रूग्णांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मृत्यूंचा आकडाही जास्त दिसून आला. आता मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरिएंटचा धोका वर्तविण्यात येत असून, याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
कोविड विषाणूचा हा प्रकार आणखी वेगाने पसरणारा आणि घातक असल्याचे सातारकरांनी एप्रिल महिन्यापासून अनुभवले आहे. ठणठणीत बरा दिसणारा रूग्णही एका दिवसात मृत्यूच्या दाढेत जात असल्याने ‘डेल्टा प्लस’च्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. हा धोका पाहता नागरिकांनी त्रिसुत्रीचे पालन करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.
डेल्टा प्लस हे तिसऱ्या लाटेचे प्राथमिक लक्षण असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात कोविडची स्थिती नियंत्रणात असली तरीही धोका अजूनही टळलेला नाही. अशा परिस्थितीतही अनेक नागरिक विनामास्क बाजारपेठेत बिनधास्त फिरताना दिसतात. यामुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
चौकट :
असा टाळता येईल धोका
घराबाहेर पडताना मास्कचा जास्तीत जास्त उपयोग करा.
गरजेचे नसेल तर घराबाहेर पडूच नका.
किमान २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा.
इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
बाहेरून घरात आणलेल्या वस्तू निर्जंतुकीकरण करून घ्या.
घराबाहेर पडलेल्या प्रत्येकाने आंघोळ करून मगच घरात जावे.
डेल्टा प्लसची लक्षणे :
सामान्य लक्षणे
ताप, कोरडा खोकला आणि थकवा
घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होेणे, डोकेदुखी आणि अतिसार
तीव्र लक्षणे
छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे
कोट :
जिल्ह्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात असली तरीही कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. नागरिकांनी त्रिसुत्रीचे पालन करून कुटुंबातील इतर सदस्यांनाही याविषयी मार्गदर्शन करावे. कोविडची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेतच चाचणी करून उपचाराला सुरूवात करणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. प्रतापराव गोळे, सातारा