वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:44+5:302021-01-25T04:39:44+5:30
गर्दीत मास्कचा वापर सातारा : सातारा शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र त्या गर्दीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये ...
गर्दीत मास्कचा वापर
सातारा : सातारा शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र त्या गर्दीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून असंख्य सूज्ञ नागरिक मास्कचा वापर करत आहेत. मात्र, अनेक कापड विक्रेते मात्र मास्कचा नीट वापर करत नाहीत किंवा हनुवटीजवळ मास्क घेत असतात.
कुत्र्यांची झुंड
सातारा : शहरात जागोजागी कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत. या कुंडीतील श्वान वाहनधारकांवर हल्ला करताना पाहायला मिळत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या लोकांना देखील त्रास सोसावा लागत आहे. मात्र, सातारा नगरपालिकेने या समस्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहेत.
रस्त्यावर पाण्याचे तळे
सातारा : शहरात अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यांत पाणी साचून राहत आहे. तसेच तुंबलेली गटारे पालिकेने साफ केलेली नाहीत. त्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावरील खड्ड्यांत साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.
खड्ड्यांतून प्रवास...
सातारा : सातारा शहरातील महादरे-मंगळवार तेळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतूनच वाहनधारकांना जावे लागत आहे. पाऊस पडला की या परिसरात खड्डा पडतो. पाणी साचून राहिल्यानंतर वाहने जाऊन खड्डा आणखी मोठा होतो. येथील खड्डे डांबरीकरणाने मुजवावेत, अशी मागणी होत आहे.
सीसीटीव्हीची मागणी
सातारा : जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी गर्दी होत असते. त्याचा फायदा घेऊन पाकीट मारणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागायला नको, म्हणून अनेकजण गुन्हे दाखल करत नाहीत. दरम्यान, शहरातील गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नागरिकांकडून अस्वच्छता
सातारा : सातारा शहरातील अनेक चौकांमधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विखरून टाकत असतात. कधी-कधी हा कचरा रस्त्यावर येतो.
महामार्गाचे काम पूर्ण करा
सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे. सातारा-पंढरपूर या महामार्गाचे काम सुरू होऊन अनेक वर्षे होत आली. पण, अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वन्यप्राण्यांचा वावर
बामणोली : कास परिसरात तरस या वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
जनावरे रस्त्यावर...
कोरेगाव : शहरात मोठ्या संख्येने मोकाट गाईंचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शहरातील दुभाजकांवरतीच या मोकाट गाई बसत असल्याने त्यांचा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
कलिंगडाला मागणी वाढली
वाई : आहारासाठी उत्तम असलेल्या कलिंगड फळाची मोठ्या प्रमाणात सध्या येथील बसस्थानक व मंडई परिसरात विक्री केली जात आहे. अगदी स्वस्त दराने कलिंगडाची विक्री केली जात असल्याने याची खरेदीही मोठ्या प्रमाणात नागरिक करीत आहेत.
रस्त्याची चाळण
सातारा : चारभिंती ते शाहूनगर येथील रस्ता लवकरात-लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे.
कचऱ्याचे वाढते साम्राज्य
शिरवळ : पुणे-बंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिक व प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.
आदर्श माता-पिता पुरस्कार वितरण
सातारा : जगत शांती प्रतिष्ठान निवकणे (ता. पाटण) यांच्यावतीने जगन्नाथ जाधव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदर्श माता-पिता पुरस्कार मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये शिवाजी बोलके, बबनराव माळी, धम्मचारी प्रशील, सुदाम चोखा रोकडे, धम्ममित्र निवृत्ती मगरे, राजाराम लक्ष्मण भंडारे व धर्मा यशवंत कांबळे यांना आदर्श माता-पिता पुरस्कार वितरित करण्यात आले. (फोटो : २४पुरस्कार)