Satara: विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील हॉटेलचे बेकायदेशीर बार सील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:24 AM2024-05-31T11:24:56+5:302024-05-31T11:25:12+5:30
महाबळेश्वर (जि. सातारा) : पुणे पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय मिळकतीमध्ये आलिशान ...
महाबळेश्वर (जि. सातारा) : पुणे पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय मिळकतीमध्ये आलिशान हॉटेल असून, याठिकाणी विनापरवाना बांधकाम व बार असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बारला सील ठोकले.
तीन दिवसांच्या विश्रांतीसाठी गावी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले. माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता या हाॅटेलची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. या आदेशाने जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली.
महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना तातडीने सातारा येथे बोलावून घेण्यात आले. अग्रवाल यांच्याकडे असलेल्या शासकीय मिळकतीची मूळ मालकी, वापर, बांधकाम परवाना, बार, स्पा यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या हाॅटेलमधील बार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करून पुढील चौकशीसाठी हाॅटेलमधील बारला सील ठोकले.