गणेशवाडीत बेकायदेशीर बैलगाडी शर्यती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:14+5:302021-03-30T04:23:14+5:30
औंध : खटाव तालुक्यातील औंधजवळील गणेशवाडी येथे बेकायदेशीररीत्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल औंध पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी ...
औंध : खटाव तालुक्यातील औंधजवळील गणेशवाडी येथे बेकायदेशीररीत्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल औंध पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी पिकअपसह तीन लाख ७७ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औंधजवळ असलेल्या गणेशवाडी येथे गणेश मंदिराच्या मागे बेकायदेशीर बैलगाडी शर्यती सुरू असल्याची माहिती खब-यामार्फत पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे, पोळ यांनी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता छापा मारला असता गणेश पोपट गोडसे, विकास अरविंद गोडसे (दोघेही रा. वडूज), अविनाश सुभाष बोडरे, विकास तानाजी चव्हाण (दोघेही रा. औंध) आणि राहुल साहेबराव घाडगे, चारुदत्त शेखर गुरव (दोघेही रा. येळीव) यांनी बेकायदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याचे समोर आले.
कोरोनाकाळात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल सहा जणांविरुद्ध औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून तीन लाख ५० हजार रुपयांची पिकअप गाडी, २० हजार रुपयांच्या दोन दुचाकी आणि सात हजार रुपयांचा बैलगाडी छकडा असा एकूण तीन लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन बैलमालकांकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
\\\\\\\\\\\\\\\\\\\