सातारा: पुसेगावात अवैध गुटखा वाहतूक, पावणे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकजण ताब्यात
By जगदीश कोष्टी | Published: September 13, 2022 04:10 PM2022-09-13T16:10:14+5:302022-09-13T16:10:51+5:30
अवैद्य धंद्यांवर पोलिसांचे कारवाईचे सत्र सुरू
पुसेगाव : ‘ऑल आऊट ऑपरेशन’ तसेच अवैद्य धंद्यांवर पोलिसांचे कारवाईचे सत्र सुरूच असून, याअंतर्गत सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात कारवाई करण्यात आली. यामध्ये गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त जप्त केला आहे, अशी माहिती पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल आऊट ऑपरेशन तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार पुसेगाव परिसरात कसून तपास सुरू आहे. छत्रपती शिवाजी चौक येथे सहायक पोलीस निरीक्षक शितोळे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सुधीर येवले तसेच इतर कर्मचारी ऑल आऊट ऑपरेशनची कारवाई करीत होते.
शितोळे यांना माहिती मिळाली की, पुसेगाव परिसरात मनोज पोपट कुंभार (रा. चिमणगाव ता. कोरेगाव) हा पिकअप (एमएच ११-सीएच ०६०३) गाडीतून बेकायदा बिगर परवाना गुटख्याची वाहतूक करीत आहे. त्यानुसार संबंधित गाडीचा पुसेगाव परिसरात शोध घेत असताना बुध रस्त्याला मंगल वस्त्रनिकेतनसमोरील रोडवर ती गाडी बुध बाजूकडे निघालेली दिसली. गाडी चालकाकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता, गाडीत २५ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली साडेचार लाख रुपये किमतीची गाडी, असा ४ लाख ७५ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलीस हवालदार चंद्रहार खाडे, आनंदा गंबरे, विपुल भोसले, विजय खाडे, सचिन जगतान, सुनील अबदागिरे, वैभव वसव यांनी सहभाग घेतला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे अधिक तपास करीत आहेत.