चूक माणसाची शिक्षा मोराला; साताऱ्यातील सेल्फी मोराचे नियमबहाय्य स्थलांतर!

By प्रगती पाटील | Published: June 10, 2024 05:19 PM2024-06-10T17:19:20+5:302024-06-10T17:20:14+5:30

वन कर्मचारीच वन कायद्याविषयी अनभिज्ञ असल्याचा आरोप

Illegal migration of Selfie Peacock in Satara | चूक माणसाची शिक्षा मोराला; साताऱ्यातील सेल्फी मोराचे नियमबहाय्य स्थलांतर!

चूक माणसाची शिक्षा मोराला; साताऱ्यातील सेल्फी मोराचे नियमबहाय्य स्थलांतर!

सातारा : गोळीबार मैदान येथील नाचणाऱ्या मोराचे वनविभागाच्या हस्तक्षेपाने नुकतेच स्थलांतर करण्यात आले आहे. हे स्थलांतर नियमबाहय्य असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. कोणत्याही वन्यजीवाचे स्थलांतर करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबीचा विचार न करता हे स्थलांतर केले गेल्याचे आक्षेप वनविभागावर घेण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, मागील काही दिवसांपासून गोळीबार मैदान परिसरामध्ये एक मोर प्रणयाराधन अथवा प्रजननाकरिताच्या प्रदर्शनासाठी पिसारा फुलवून नाचत होता. या दरम्यान परिसरातील लोकांच्या तो नजरेस पडला व तेथे दररोज त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. याविषयी सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रे या माध्यमातून लोकांना मोराच्या या कृतीमध्ये त्यास बाधा अथवा हानी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य अथवा हस्तक्षेप न करण्याचे आवाहन वनविभागाने करणे अपेक्षित असतानाही त्यांच्याकडून याबाबत काहीच जनजागृती झाली नाही.

वन विभागाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर विभागाने तेथे एक दिवस लोकांना हटकण्याचे काम केले. परंतु त्यानंतर वनपाल व कर्मचाऱ्यांनी स्वतःच हा मोर पकडून दुसऱ्या अधिवासात सोडण्यात आल्याचे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची लेखी परवानगी घेण्याचेही परिश्रम या कर्मचाऱ्यांनी घेतले नसल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

या कारणांनी बदलला जातो अधिवास

कोणत्याही वन्यजीवाचा अधिवास बदलायचा असेल तर त्यासाठी प्रधान मुख्य वनसरंक्षरक (वन्यजीव) नागपूर यांची लेखी परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी देण्यापूर्वी वन्यजीवाला अपघातात काही दुखापत झाली असेल तर, मानवीवस्ती मध्ये येऊन वन्यजीव त्यांना त्रासदायक ठरत असेल तर आणि आपल्या नैसर्गिक अधिवासाचे नुकसान करत असेल तरच वन्यजीवांचे स्थलांतर करायला परवानगी दिली जाते. याशिवाय अन्य कोणत्याही कारणांनी ही परवानगी दिली जात नसल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.

मान्सूनच्या पूर्वसंध्येला वळीवाच्या उत्तरार्धापासून ते मध्य पर्जन्य हंगामापर्यंत मोर पिसारा फुलवून आपल्या साैंदर्याचे प्रदर्शन करतात. सर्वसाधारणपणे हा हंगाम मोरांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे ही क्षेत्रे ही वन्यजीवांची बेडरूम असतात. अशा ठिकाणी नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्याएेवजी संबंधीत मोराचे केलेले स्थलांतर म्हणजे त्याला थेट दुसऱ्याच्या घरात सोडण्यासारखे आहे. वन विभागाची ही कृती नियमबहाय्य आहे. यात दोषींवर कारवाइ करण्यात यावी. - सुनील भोईटे, माजी मानद वन्यजीव रक्षक, सातारा.

Web Title: Illegal migration of Selfie Peacock in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.