‘कृष्णा’तून बेकायदा वाळू उपसा !
By admin | Published: July 29, 2015 09:31 PM2015-07-29T21:31:28+5:302015-07-30T00:33:35+5:30
घोणशीत महसूल विभागाचे दुर्लक्ष : दिवसाढवळ्या बेधडक वाहतूक; पर्यावरणाची हानी, ग्रामस्थांना दमदाटीचे प्रकार
कऱ्हाड : घोणशी, ता. कऱ्हाड येथे गेल्या काही महिन्यांपासून नियमबाह्यरीत्या दिवसन्रात्र होत असलेल्या वाळूउपसा व त्याच्या वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नाही. संबंधित प्रशासनाला हाताशी धरून वाळूठेकेदारांचा राजरोसपणे हा प्रकार सुरू आहे. वाळू ठेकेदारांकडून आता स्थानिकांना दमदाटीचे प्रकारही सुरू झाले असून, त्यांच्या वाढत्या शिरजोरीमुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.कऱ्हाड तालुक्यात प्रशासनाच्या नियम व अटींना बगल देत वाळू ठेकेदारांकडून अनधिकृत वाळूउपसा व वाहतूक होत असल्याचे प्रशासनाच्या वेळोवेळीच्या कारवाईतून उघड झाले आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महागाव, ता. जि. सातारा येथील एका अनधिकृत वाळू ठिय्याविरुद्ध स्वत: धडक मोहीम राबवून तेथील नियमबाह्य वाळूउपसा बंद केल्याने जिल्हाधिकारी अनधिकृत वाळू ठिय्यांना चाप बसवतील, अशी अपेक्षा आहे. कऱ्हाड तालुक्यातही नियमबाह्य वाळूउपसा व वाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. घोणशी येथील वाळू ठिय्यांवर अशीच परिस्थिती आहे. प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. वाळू ठेकेदारांची परिसरात दहशत वाढली असून, ते मनमानी पद्धतीने वाळूची लूट करीत पर्यावरणाची हानी करीत आहेत. हे ठेकेदार प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसते.घोणशी-कोपर्डे हवेली या संयुक्तिक ठेक्यावर सध्या उपसा सुरू आहे. संबंधित ठेकेदार काहींना हाताशी धरून हा उद्योग करीत आहे. त्याचा वाळूउपसा व वाहतुकीचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. महसूल विभागही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत असल्याची स्थिती आहे. महसूल विभागाच्या नावावरच घोणशी परिसरात खुलेआमपणे नियमबाह्य वाळूउपसा व त्याची वाहतूक केली जात आहे.
घोणशी, वहागाव येथून वाळू वाहतूूक करणाऱ्या वाहनांकडे प्रशासनाची कसलीच परवानगी नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर गावांत महसूल विभागाच्या कारवाईच्या बातम्या ऐकावयास मिळत असताना घोणशी परिसरात अनधिकृत वाळूउपसा व त्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारवाईच होत नसल्याने ठेकेदारांची शिरजोरी वाढत चालली असल्याचे दिसते.
तीन-चार महिन्यांत महसूल विभागाची कसलीही कब्जेपट्टी, परवानगी, पावती नसताना वाळूचे बेकायदा उत्खनन करून शासनाचा लाखोंचा महसूलही बुडविला जात आहे.
तसेच वाळू ठेकेदारांनी नियमबाह्य केलेल्या वाळू उत्खननाने परिसरातील पर्यावरणाचेही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. वहागाव, घोणशी, बेलवडे हवेली, तासवडे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाळू ठेकेदारांनी अनधिकृत साठविलेला वाळूसाठा हासुद्धा चर्चेचा विषय असून, महसूल विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
... तर कोपर्डेतील घटनेची पुनरावृत्ती !
घोणशीत दररोज रात्रीच्या वेळी नियमबाह्यरीत्या होत असलेल्या वाळूउपसा व वाहतुकीवर जिल्हा महसूल प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. तसेच वाळू ठेकेदारांकडून परिसरातील ग्रामस्थांना होत असलेल्या दमदाटीमुळे कोपर्डे हवेली येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाने या वाळू उपशावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
... तर कोपर्डेतील घटनेची पुनरावृत्ती !
घोणशीत दररोज रात्रीच्या वेळी नियमबाह्यरीत्या होत असलेल्या वाळूउपसा व वाहतुकीवर जिल्हा महसूल प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. तसेच वाळू ठेकेदारांकडून परिसरातील ग्रामस्थांना होत असलेल्या दमदाटीमुळे कोपर्डे हवेली येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाने या वाळू उपशावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.