अवैध वाळू उपशाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: July 14, 2015 12:24 AM2015-07-14T00:24:22+5:302015-07-14T00:24:22+5:30
जिल्हाधिकारी : प्रांत, तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
सातारा : महागाव (ता. सातारा) येथे अवैधरीत्या झालेल्या वाळू उपशाप्रकरणी दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तहसीलदार राजेश चव्हाण व उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांना सोमवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वाळूचा उपसा सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ही कारवाई केली होती. महागाव येथे वाळू उपसा अवैधरीत्या होत असून, या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याचे मुदगल यांनी नोटिशीत नमूद केले आहे.याबाबत संबंधित तहसीलदार व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)