अवैध वाळू उपशाने बंधाऱ्याला गळती !
By admin | Published: April 2, 2017 11:05 PM2017-04-02T23:05:00+5:302017-04-02T23:05:00+5:30
अस्तित्वालाच सुरुंग : पाणी संपल्याने शिरवळमधील शेतकऱ्यांसमोर समस्या
शिरवळ : शिरवळ गावच्या हद्दीत फुलमळा या ठिकाणी असणाऱ्या पाणी साठवण बंधाऱ्याला अवैध वाळू उपशामुळे गळती लागली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये बंधाऱ्यामध्ये पाणी न राहिल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, वाळू उपशामुळे बंधाऱ्याच्या अस्तित्वालाच सुरुंग लागला आहे. शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये फुलमळ्यालगत असणाऱ्या मांड ओढ्यावर तत्कालीन आमदार मदन भोसले यांच्या माध्यमातून २००५ मध्ये १५ लाख रुपये खर्चून पाणी साठवण बंधारा उभारण्यात आला होता. त्यावेळी साठवण बंधारा उभारल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक झाल्याने शेतकऱ्यांना साठवण बंधारा हा वरदान ठरला. या बंधाऱ्यामुळे विहिरींना पाणीही मुबलक राहत असल्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न संपला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे साठवण बंधाऱ्यामध्ये अवैध वाळू उपसा होत होता. परिणामी साठवण बंधाऱ्याला गळती लागली असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. या ठिकाणी दररोज अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याने बंधाऱ्यांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. साठवण बंधाऱ्याला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असून, बंधाऱ्यांमध्ये केवळ पाण्याचे डबके शिल्लक राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, या ठिकाणी ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या समस्यांना व टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या ठिकाणी वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असल्याने बंधाऱ्याच्या अस्तित्वालाच या ठिकाणी सुरुंग लागला आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून तसेच संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. साठवण बंधाऱ्याला गळती लागल्याने येथील विहिरींनाही पाण्याची कमतरता उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीला पाणी पुरवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
या साठवण बंधाऱ्यामध्ये गाळाचे साम्राज्य पसरले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे गाळ उपसा करण्याची तोंडी मागणी केली. त्यावेळी संबंधितांकडून जाणीवपूर्वक उपसा केल्यास कारवाईची भीती दाखविण्यात आली. परिणामी मागणीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रशासनाने जलयुक्त शिवारांतर्गत अथवा कोणत्याही योजनेअंतर्गत गाळ उपसा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे प्रशासन व संबंधित विभागाने अवैध वाळू उपशाला पायबंद घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शिरवळ येथील साठवण बंधाऱ्याला लागलेल्या गळतीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन व संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन साठवण बंधाऱ्याची गळती थांबवून शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक आहे. प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्यास शिरवळ ग्रामस्थ आंदोलन करतील. याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनाची राहील.
- विजय पवार,
ग्रामपंचायत सदस्य
शिरवळ येथील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या साठवण बंधाऱ्याच्या गळतीकडे संबंधितांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दाखल घेतली गेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवण बंधाऱ्यामधून पाणी गळती होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
- उमेश गिरमे,
सामाजिक कार्यकर्ते