पाचवड येथे बेकायदा वाळू वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:36+5:302021-04-16T04:39:36+5:30
मायणी : पाचवड, ता. खटाव येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मायणी पोलिसांनी कारवाई करून दोन लाख तीन हजार ...
मायणी : पाचवड, ता. खटाव येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मायणी पोलिसांनी कारवाई करून दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, विखळे-पाचवड मार्गावरून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस दूरक्षेत्रामध्ये कार्यरत असलेले होमगार्ड रोहित घाडगे व विश्वास बागल हेे विखळे रोडलगत सापळा लावून बसले. त्याचवेळी विखळे बाजूने पाचवडकडे एक गाडी येताना त्यांना दिसली. संबंधित गाडी थांबवून चौकशी केली असता गाडीमध्ये अवैध वाळू सुमारे अर्धा ब्रास असल्याचे दिसून आले. पोलीस असल्याचे समजताच वाहनचालक विशाल बाळासाहेब साळुंखे (रा. मायणी, तालुका खटाव) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यावेळी पाठीमागून होमगार्ड विशाल साळुंखे तुला आम्ही ओळखतो, असा आवाज देत होते. तरीही तो न थांबता निघून गेला.
पिवळ्या रंगाची पिकअप (एम.एच. ११ बी.एल. ४१६६) अंदाजे दोन लाख रुपये किंमत, तर पिकअपमधील वाळू सुमारे ३५०० असा एकूण दोन लाख तीन हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेची नोंद मायणी पोलीस दूरक्षेत्रामध्ये झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी हे करत आहेत.