बारशाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा : ग्रामीण भागातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:56 PM2018-06-22T22:56:02+5:302018-06-22T22:57:05+5:30
बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
दशरथ ननावरे।
खंडाळा : बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या शौर्य कथांच्या आठवणींना ग्रामीण भागात आजही लहान मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमातून उजाळा दिला जातोय.
मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोळा संस्कारांना विशेष महत्त्व आहे. या प्रत्येक संस्कारावेळी आपल्या वेगळ्या संस्कृती अनुभवायला मिळतात. असाच एक महत्त्वपूर्ण संस्कार म्हणजे बाळाचे बारसे.
१९४२ चा स्वातंत्र्य लढा, महात्मा गांधीजींचा सत्याग्रह, तुरुंगवास, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेनेची स्थापना करून दिलेला लढा, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भूमिगत होऊन प्रतिसरकार स्थापन केले.
मात्र त्यांच्या कार्यशैलीने ते प्रतिसरकार नावाने प्रसिद्ध झाले. यांसह जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अरुणा देवी आदी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रज सरकार विरोधात उठाव करून आगगाडी बंद करणे, कोर्ट कचेरी, पोस्ट आॅफिस बंद पाडणे, गोऱ्या साहेबाला अडवणे यासारख्या घटनांचा उजाळा देत गोरगरिबांवर अन्याय कसा हटवला जात होता. स्वातंत्र्यसाठी क्रांतिकारकांचे योगदान व प्राणार्पण यांचे हुबेहूब वर्णन बारशाच्या कार्यक्रमातून पाळणा म्हणताना आजही केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.हे ऐकूण अंगावर शहारा उभा राहतो. वृद्ध महिलांनी या स्मृती जागृत ठेवल्या आहेत. ग्रामीण भागातील अशा कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शनही घडते.
आमच्या लहानपणापासून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी योगदान दिले त्यांच्या कार्यस्मृतींना उजाळा पाळण्याच्या रुपाने ऐकत आलो आहोत. ही रुढी परंपरा पुढील काळातही सुरू राहिली पाहिजे. याद्वारे नव्या पिढीला किमान स्वातंत्र्याची महती समजेल.
- ताराबाई शिंदे, म्हावशी