बेकायदेशीर क्रशर तात्काळ बंद करा; सुरुर व मोहोडेकरवाडी ग्रामस्थांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:15 PM2020-02-26T14:15:50+5:302020-02-26T14:20:34+5:30
मोहोडेकरवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील गट नंबर 5 मध्ये मोहन दादासो गायकवाड यांचे मालकीची बेकायदेशीर चालू असलेली दगडखाण व खडी क्रशर तात्काळ बंद करावी, अशी जोरदार मागणी सुरुर् व मोहोडेकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या बेकायदेशीररित्या चालू असलेल्या क्रशरमुळे अनेक दुष्परिणाम होत असून लोकांचे तसेच पशुपक्षांचे जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच ही बेकायदेशीर क्रशर तात्काळ बंद करावी यासाठी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
वेळे/सातारा : मोहोडेकरवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील गट नंबर 5 मध्ये मोहन दादासो गायकवाड यांचे मालकीची बेकायदेशीर चालू असलेली दगडखाण व खडी क्रशर तात्काळ बंद करावी, अशी जोरदार मागणी सुरुर् व मोहोडेकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या बेकायदेशीररित्या चालू असलेल्या क्रशरमुळे अनेक दुष्परिणाम होत असून लोकांचे तसेच पशुपक्षांचे जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच ही बेकायदेशीर क्रशर तात्काळ बंद करावी यासाठी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
पुणे सातारा महामार्गाच्या सहापदरिकरण कामाच्या वेळी या रस्ता ठेकेदाराने सदरील गट नंबर 5 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात कायदेशीर परवानग्या घेवून सदरील जागेत राष्ट्रीय महामार्ग बनविण्याच्या हेतूने ही क्रशर चालू केली होती. राष्ट्रीय महामार्ग ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याच्या कामात अडथळा ठरू नये म्हणून येथील ग्रामस्थांनी ही तात्पुरती परवानगी दिली. मात्र काम संपलेनंतर सदरील ठेकेदाराने ही क्रशर बंद करून आपली मशिनरी काढून टाकायला हवी होती. परंतु या ठेकेदाराने संपूर्ण मशिनरी काढून टाकली नाही.
याचाच गैरफायदा घेत मोहन दादासो गायकवाड यांनी घेतला आणि सन 2016 साली मोहोडेकरवाडी ग्रामपंचायतीस याच जमीन मिळकतीत दत्तकृपा सप्लायर्स या नावाने दगडखाण काढणेस परवानगी मागितली. ग्रामपंचायतीने ग्रामसभेची परवानगी दिली मात्र जून 2017 मध्ये झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे ही परवानगी रद्द करण्यात आली. तरीही आजपर्यंत ही क्रशर व दगड उत्खनन दंडेलशाहीने चालूच आहे. याला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे की प्रशासकीय अधिकारी देखील यात सामील आहेत, हेच मोठे गौडबंगाल आहे.
कोणतीही अधिकृत परवानगी नसताना देखील ही क्रशर व दगडखाण आजपर्यंत चालू राहतेच कशी? आर्थिक जोरावर अजून किती दिवस ही क्रशर चालू ठेवता येणार आहे? असे संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना याबाबत काहीच माहिती नसणे हे मोठे दुर्भाग्यच आहे. त्यामुळेच राजरोसपणे हा गोरखधंदा अहोरात्र चालू आहे, यात शंकाच नाही.
या बेकायदेशीर धंद्यामुळे तेथे राहणारे लोक भयंकर संतापले असून ज्वालामुखी प्रमाणे त्यांच्या राग अनावर झाला आहे. क्रशर मालक दमदाटी करून धमक्याही देत असलेबाबत पोलीस ठाण्यात तक्रारीही देण्यात आल्या आहेत. संबंधित क्रशरचे वाहनचालक देखील येथील स्थानिक रहिवाशांना अरेरावी करीत आहेत. केवढी ही मिजास? मात्र तरीही प्रशासन अजून झोपेतच असल्याचे सोंग आणत आहे. म्हणूनच त्यांना जागे करण्यासाठी लोकांनी एकत्र येत हा गोरखधंदा कायमचा बंद करण्यासाठी एल्गार पुकारला आहे.
येथे घडविण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे मोठे हादरे बसून अनेकांच्या घरांच्या भिंतीला तडे गेले आहेत. जमिनीतील पाण्याचा प्रवाह बदलला गेल्यामुळे पाणी टंचाई देखील भासत आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे शेतपिकांचे अपरिमित नुकसान होत आहे. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून पाळण्यात येणाऱ्या पशू व पक्षांना देखील या धुळीचा व आवाजाचा त्रास होवून ती दगावत चालली आहेत. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना व शेतकऱ्यांना याचा फार मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. तसेच विहिरी ढासळू लागल्या आहेत.
पिण्याचे पाणी दूषित होत चालले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. अनेक लोकांना या धुळीच्या त्रासाने श्वसनाचे विकार झाले आहेत. तसेच मानवी वस्ती जवळ असल्याने दैनंदिन जीवनावरही अनेक परिणाम झाले आहेत. अवजड वाहनांमुळे येथील रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. त्याही धुळीचा त्रास नागरिकांना होत आहे.
शेतीसाठी काढलेले कर्ज फिटत नाही तोच आजारपण समोर येत असल्याने अजूनच कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे कर्जात वाढ होवू लागल्याने येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परंतु राजकीय वरदहस्त व आर्थिक जोरावर दंडेलशाहीच्या मार्गाने सुरू असलेला हा गोरखधंदा अजूनही बंद होताना दिसत नाही.
हा बंद व्हावा म्हणून येथील नागरिकांनी महसूल विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित कार्यालयाशी रीतसर तक्रार केली आहे. मात्र या तक्रारींची तातडीने दखल घेवून, चौकशी करून ही बेकायदेशीर क्रशर त्वरीत बंद करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात प्रशासनाने विलंब लावू नये, हेच येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
रॉयल्टी चे काय?
बेकायदेशीर सुरू असलेल्या क्रशरमधून गेली काही वर्षे जे उत्खनन झाले त्याची रॉयल्टीची रक्कम शासकीय तिजोरीत भरणा केली आहे का नाही, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर ही रक्कम शासकीय तिजोरीत जमा केली असेल तर ती कोणत्या पद्धतीने केली गेली आणि नसेल तर त्याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल विभाग याबाबत अनभिज्ञ कसा? याबाबत नक्कीच साशंकता निर्माण होते. शासनाची फसवणूक करणे हा देखील खूप मोठा अपराध आहे. महसूल विभागाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
मी गावठी कोंबडी पालन केले होते. यासाठी कर्जाऊ रक्कम घेवून शेड देखील बांधले होते. मात्र येथून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे येथील रस्त्यावरची धूळ उडून या पक्षांना संसर्ग होऊ लागला. त्यातच हे सर्व पक्षी मरू लागले. त्यामुळे मी कर्जबाजारी होत गेलो. माझ्यासारखे अजून बरेच शेतकरी आहेत.
- प्रशांत चव्हाण,
स्थानिक रहिवाशी
स्फोटकांच्या हादऱ्या ने माझ्या राहत्या घराला अनेक तडे गेले आहेत. तसेच धुळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेती उत्पादन घटले असून श्र्वास घेताना त्रास जाणवत आहे. लहान मुलांना देखील याचा जास्त त्रास होत आहे.
- संतोष चव्हाण,
स्थानिक रहिवाशी