कोरेगाव उपकेंद्रावर लवकरच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:35+5:302021-05-08T04:40:35+5:30
कोरेगाव : ‘तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरेगाव उपकेंद्रावर तातडीने लसीकरण केंद्र सुरू करावे. जिल्हा परिषदेने त्यासाठी तातडीने ...
कोरेगाव : ‘तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरेगाव उपकेंद्रावर तातडीने लसीकरण केंद्र सुरू करावे. जिल्हा परिषदेने त्यासाठी तातडीने आदेश काढावेत,’ अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने उपनगराध्यक्षा मंदा बर्गे, सामाजिक कार्यकर्ते किशोर बर्गे व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. गणेश होळ यांनी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेण्यात आला असून, हे केंद्र लवकरच कार्यान्वित होणार आहे.
किशोर बर्गे व डॉ. गणेश होळ यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद कार्यालयात उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची भेट घेऊन लसीकरण केंद्राच्या मागणीचे निवेदन दिले होते. या वेळी झालेल्या चर्चेत बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले की, तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या सर्वच उपकेंद्रांवर लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. कोरेगाव शहरासाठी स्वतंत्र उपकेंद्र मंजूर आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय आणि तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी कोरेगाव शहरात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत नगरपंचायतीमार्फत केली जाईल.
आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून प्रदीप विधाते व डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी तातडीने मान्यता दिली आहे. लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे.