फलटण-बारामती रेल्वेमार्गाचे काम त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:34+5:302021-02-05T09:06:34+5:30

फलटण : फलटण ते बारामती या रेल्वेमार्गाचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडले आहे. या कामाला त्वरित गती देऊन हा मार्ग ...

Immediate work on Phaltan-Baramati railway line | फलटण-बारामती रेल्वेमार्गाचे काम त्वरित करा

फलटण-बारामती रेल्वेमार्गाचे काम त्वरित करा

googlenewsNext

फलटण : फलटण ते बारामती या रेल्वेमार्गाचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडले आहे. या कामाला त्वरित गती देऊन हा मार्ग लवकर पूर्ण करावा, तसेच या रेल्वेमार्गासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी अपेक्षा सोलापूर रेल्वे विभागाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.

येथील तहसील कार्यालयात फलटण ते बारामती रेल्वेसंदर्भात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, वरिष्ठ रेल्वे व्यवस्थापक सुनील मिश्रा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मनोरंजन कुमार, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार समीर यादव आदी उपस्थित होते.

लोणंद ते फलटण या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावर रेल्वेसेवाही सुरू झाली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात रेल्वे बंद पडली असली तरी फलटण ते पुणे अशी रेल्वे आपण मागणी केल्याप्रमाणे लवकरच सुरू होणार आहे. फलटण आणि सुरवडी रेल्वेस्टेशनवरील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच इमारतीची रंगरोगोटी करावी. फलटण रेल्वेस्टेशनवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिले.

फलटण ते बारामती या रेल्वेमार्गाचे काम खूपच संथगतीने चालू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून भूसंपादनाचे प्रश्न शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करून सोडवावेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष संपर्क साधावा. ज्या काही अडचणी फलटण ते बारामती या दरम्यान येत आहे. त्याबाबत सातारा व पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, या मार्गाने काम लवकर होण्यासाठी सर्वांशी समन्वय ठेवणारा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी अपेक्षा खा. रणजितसिंह यांनी व्यक्त केली.

रेणू शर्मा यांनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून फलटण ते बारामती रेल्वेमार्गावर येणाऱ्या अडचणी त्वरित दूर केल्या जातील. फलटण ते लोणंद रेल्वेमार्गाची पुन्हा पाहणी करून या मार्गावरील सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. बैठकीनंतर फलटण रेल्वेस्टेशनची अधिकाऱ्यांसोबत खा. रणजितसिंह यांनी पाहणी करून स्टेशनचे सुशोभिकरण करण्याचे आदेश दिले.

चौकट...

अधिकाऱ्यांनी अडचणींचा बाऊ करू नये....

फलटण ते बारामती हा रेल्वेमार्ग झाल्यास दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यासाठी कमी वेळ लागणार आहे तसेच शेतकऱ्यांचा भाजीपाला लवकर मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मदत होणार असून या मार्गामुळे पुणे रेल्वेस्टेशनवर पडणारा अतिभार कमी होणार आहे. फलटण ते बारामती रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकार निधी देण्यात कमी पडणार नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी अडचणींचा बाऊ करू नये. हा रेल्वेमार्ग लवकर कसा पूर्ण होईल, याकडे जातीने लक्ष द्यावे. आदर्की रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रवाशांची दमछाक होत असून, एक तर हा रेल्वेमार्ग बदलावा किंवा रेल्वेने आदर्की गावातून रेल्वेस्टेशनपर्यंत रस्ता त्वरित करावा, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही खा. रणजितसिंह यांनी दिली.

Web Title: Immediate work on Phaltan-Baramati railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.