अतिक्रमण काढल्यानंतर रुंदीकरणाला मुहूर्त
By admin | Published: July 10, 2015 10:16 PM2015-07-10T22:16:40+5:302015-07-10T22:16:40+5:30
शिरवळ : भूसंपादनची कार्यवाहीही पूर्ण; अनेक दिवसांची रस्त्याची मागणी मार्गी
शिरवळ : शिरवळ, ता. खंडाळा येथील ग्रामस्थांची रस्ता रुंदीकरणाची मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी धडक कारवाईची सूचना केली. त्यानंतर तत्परतेने भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी भूसंपादनाची कारवाई पूर्ण करीत अतिक्रमणधारकांना नोटीस दिली. त्यामुळे शिरवळ येथील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सध्या रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाल्याने शिरवळकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे महामार्गाचे काम सुरू झाल्याने आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांनाही यश आले आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या सहापदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिरवळ याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून अनेक ठिकाणी अपूर्ण कामे ठेवण्यात आली होती. तसेच शिर्के पेपर मिल ते शिरवळ गावात येणारा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात अरुंद करण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती. तर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या कारणामुळे शिरवळ ग्रामस्थांनी सर्वपक्षीय आंदोलन करीत शिरवळ येथील महामार्गालगतचे काम घेतलेल्या रिलायन्सच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याबरोबर शिरवळ ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर यांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अमृत नाटेकर यांनी ग्रामस्थांसमवेत शिरवळ परिसरातील महामार्गांची पाहणी करीत दि. ९ पासून कायदेशीर बाबी पूर्ण करून सर्व्हिस रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानुसार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी शिरवळ परिसरातील अतिक्रमणधारकांना दणका दिला. त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या. शिर्के पेपर मिल जवळील सर्व्हिस रस्त्त्याचे व पुलाच्या कामाच्या रुंदीकरणाची सुरुवात करीत शिरवळकरांना सुखद धक्का दिला आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी नाटेकर यांच्या समवेत खंडाळा तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, शिरवळचे उपसरपंच उदय कबुले, राजेंद्र तांबे, रिलायन्सचे बिजेंद्रकिशोर सिंग, बी. के. सिंग, संपत मगर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खंडाळा तालुक्यातील शिरवळ ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिलेल्या सुचनेनुसार सर्व कायेदीशर कार्यवाही पूर्ण केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदीकरणाच्या रस्ता रुंदीकरणाची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर केसुर्डीजवळील व पारगाव येथील कायदेशीर कार्यवाहीही पूर्ण झाली आहे. त्याठिकाणीही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झालेले आहे. त्यासाठी वनविभागाची ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने केसुर्डीजवळील अपूर्ण पुलाचे लवकर काम सुरू होईल. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही.
-अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)
शिरवळचे शेतकरी व नागरिकांची अपूर्ण कामामुळे मोठ्या प्रमाणात अडचण होत होती. शिरवळ येथील महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने अनेक समस्यांना पायबंद बसणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन मार्ग सुखकर होणार आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व आमदार मकरंद पाटील यांच्या सहकार्यामुळे व प्रयत्नामुळे हे होऊ शकले.
-उदय कबुले, उपसरपंच शिरवळ