विसर्जन कण्हेर तलावात..! ऐनवेळी निर्णय , साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:27 PM2018-09-12T23:27:34+5:302018-09-12T23:28:52+5:30
गणेश बाप्पांच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मेढा रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळील तळ्याचा मंडळांनी विचार केल्यास साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्न निकाली निघेल.
सातारा : गणेश बाप्पांच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मेढा रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळील तळ्याचा मंडळांनी विचार केल्यास साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्न निकाली निघेल. बुधवारी याबाबतची पाहणीही पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच हुतात्मा, कल्याणी शाळा, दगडी शाळा व पोहण्याचे जलतरण याठिकाणी घरगुती व कमी उंचीच्या गणपतींचे विसर्जन केले जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
पोलीस करमणूक केंद्रामध्ये झालेल्या गणेश मंडळांचे पदाधिकाºयांच्या बैठकीत अधीक्षक देशमुख बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते.
अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, ‘अवघ्या काही तासांमध्येच गणेश बाप्पांचे आगमन होत आहे. विसर्जनाच्या प्रश्न निकालात निघावा, यासाठी बुधवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने सातारा शहरासह परिसरातील तळ्यांची पाहणी करण्यात आली. स्थानिक प्रशासनाच्या वतीने चार ठिकाणी गणेश बाप्पांचे विसर्जन करण्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने घरगुती व पाच ते आठ फुटांपर्यंतच्या छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
सध्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांना यंदा साधारण किती मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. याचा अंदाज घेण्यात आला. ही चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांना मेढा रस्त्यावरील कण्हेरच्या तळ्यामध्ये विसर्जन करण्याची विनंती केली. यावर ते तळे लांब असल्याचे गणेशभक्तांनी सांगताच १५ ते २० फूट असणाºया गणेशमूर्ती मुंबईवरून आणल्या जातात, मग सातारा ते कण्हेर तळे हे अवघे १३ किलोमीटरचे अंतर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिली.
गणेश मंडळांच्या निर्णयाकडे लक्ष
मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासनाकडून कण्हेर तळे सुचविण्यात आले असले तरी अद्याप विसर्जनाचा निर्णय झाला नाही. दोन दिवसांमध्ये गणेश मंडळांनी यासंदर्भात आपली भूमिका सांगावी, असे आवाहन यावेळी बैठकीत पोलिसांकडून करण्यात आले आहे.