तराफातून होणार गणेशमूर्ती विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:44 AM2021-09-15T04:44:47+5:302021-09-15T04:44:47+5:30
दरम्यान, शहरात २१ ठिकाणी पालिकेने जलकुंडाचीही व्यवस्था केली आहे. त्याठिकाणी नागरिकांनी मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले ...
दरम्यान, शहरात २१ ठिकाणी पालिकेने जलकुंडाचीही व्यवस्था केली आहे. त्याठिकाणी नागरिकांनी मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
कऱ्हाड पालिकेने येथील कृष्णा-कोयना नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी मोठा तराफा तयार करण्यात आला आहे. या तराफ्यावर गणेशमूर्ती ठेवून दोन बोटींच्या मदतीने तो नदीपात्रात नेला जाणार आहे. तराफा दोन बोटींना बांधण्यात येणार आहे. तर त्यावरून गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्यात येणार आहेत. एकाचवेळी जास्त प्रमाणात मूर्ती नदीपात्रात विसर्जित करता येणार असल्यामुळे मनुष्यबळही कमी लागणार आहे. अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने तराफा तयार करण्यात आला असून, त्याची चाचणीही करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, अभियंता एम. एच. पाटील, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी २१ जलकुंड तयार करण्यात आले असून, अनेक ठिकाणी कारंज्यांचा वापरही गणेश विसर्जनासाठी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी लोखंडी जलकुंड ठेवण्यात आले आहेत. दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले असून, आत्तापर्यंत ३५ मूर्तींचे आत्तापर्यंत जलकुंडात विसर्जन झाले आहे.
फोटो : १४केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात यंदा तराफ्यावरून गणेशमूर्ती विसर्जन केले जाणार असून, पालिका कर्मचाऱ्यांनी त्याचे प्रात्यक्षिक घेतले.