शाहूपुरी पाणी योजना लवकर कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:39 AM2021-03-26T04:39:11+5:302021-03-26T04:39:11+5:30
सातारा : सातारा- जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत मंजूर करण्यात आलेल्या शाहूपुरी साठीच्या नवीन कण्हेर पाणी ...
सातारा : सातारा- जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत मंजूर करण्यात आलेल्या शाहूपुरी साठीच्या नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्यावतीने नुकतीच करण्यात आली.
या पाहणी वेळी आघाडीचे भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, निलम देशमुख, माधवी शेटे, विकास देशमुख, सुरेश शेटे हे उपस्थित होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, कण्हेर येथील उपसा केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या एक्स्प्रेस फिडरचे आवश्यक ते वीज पुरवठा यंत्रणेचे कामही एक- दोन दिवसांत सुरू होऊन या योजनेतील मोठा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.
यावेळी, अधिकाऱ्यांशी झालेल्या कार्यालयीन चर्चेवेळी, २०१५ च्या कार्यारंभ आदेशानुसार २०१७ साली पूर्ण होणारी ही योजना २०२१ साल उजाडले तरी अनेक कारणांनी पूर्ण होऊ शकली नाही, हे दुर्दैवी वास्तव असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यामध्ये असलेल्या अपुऱ्या निधीची अडचण लक्षात घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी १२ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करून घेतला असल्याने ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, ही शाहूपुरीवासीयांची अपेक्षा आहे, अशी भावना व्यक्त केल्या.
या योजनेमध्ये उर्वरित ग्राहकांचा समावेश करणे, कनेक्शन शिफ्टिंग करणे, या योजनेंतर्गत अनेक भागात राहिलेले पाइपलाइन कामाला गती देणे आदी प्रश्नांबरोबरच सद्यस्थितीत नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी त्वरित पावले उचलण्यासंदर्भात आग्रही मागणी करण्यात आली. आघाडीच्या या सर्व मागण्यांसंदर्भात योग्य ते सहकार्य देण्याची हमी कार्यकारी अभियंता चौगुले यांनी शिष्टमंडळास दिली.