रडीचा डाव खेळत नाही; त्यांचा करेक्टर कार्यक्रम लावू; नरेंद्र पाटील यांचा शशिकांत शिंदेंना इशारा
By नितीन काळेल | Published: April 20, 2024 06:03 PM2024-04-20T18:03:10+5:302024-04-20T18:04:01+5:30
भ्रष्टाचाराच्या गोष्टी सातारकरांना सांगणार
सातारा : आम्ही रडीचा डाव खेळत नाही, कारण मुंबई बाजार समितीतील घोटाळा जुनाच आहे. कर नाही त्यांना डर तरी कशाला हवे. उलट त्यांनी खिलाडूवृत्तीने घ्यावे. या निवडणुकीत बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या गोष्टी सातारकरांना सांगून ७ मेपर्यंत त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावू, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंळडाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना दिला.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते. पाटील यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभा उमेदवार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता आरोप केले.
नरेंद्र पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत मी भाजपकडून शर्यतीत होतो, तसेच पक्षाकडे इच्छाही व्यक्त केली होती. पण, पक्षाने सातारकरांच्या भावनांचा विचार करून उदयनराजेंना उमेदवारी दिली. माथाडी कामगारांची मुंबईत बैठक असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येता आले नाही. त्यामुळे आता साताऱ्यात आलो आहे. या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने अपेक्षा केली असली, तरी मी साथ देणार नाही. जे माथाडी कामगार साथ देणार आहेत, त्यांनीही विचार करावा. कारण, २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्यामुळेच मला पराभवाला सामोरे जावे लागले.
जीवनात कोणासाठी खड्डा करायचा नसतो. माणसाने वयाप्रमाणे वागावे हे त्यांना कळायला हवे. काय चुकीचे केले असेल, तर कारवाईला सामोरे जावे, असे सांगून पाटील पुढे म्हणाले, त्यांच्या गोष्टी टप्प्याटप्प्याने बाहेर येतील. त्यामुळे आताही त्यांनी आत्मपरीक्षण करून उमेदवारीचा निर्णय घ्यावा. माथाडी संघटनेचाही त्यांनी स्वार्थासाठी उपयोग केला.
भ्रष्टाचारात ते खोल गेलेत..
ही निवडणूक देशपातळीवरील आहे हे मान्य. पण, समोरील उमेदवाराचा तोल जात आहे. भ्रष्टाचारात ते खोल गेले आहेत. चारवेळा विधानसभा लढलेले आणि आता विधान परिषदेत असलेले कधी अण्णासाहेब पाटील कुटुंबीयांचे झाले नाहीत. त्यांचा कार्यक्रम कोरेगावकरांनी कधीच केला आहे, असेही नरेंद्र पाटील यांनी निक्षून सांगितले.