लॉकडाऊनची अंमलबजावणी : मलकापुरात येणारे सर्व रस्ते सील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 02:38 PM2021-05-04T14:38:13+5:302021-05-04T14:41:30+5:30
CoronaVirus Satara : शासनाचे लावलेल्या निर्बंध मंगळवारपासून आणखीनच कठोर करण्यात आले. मलकापुरातील मेडिकल दुकाने वगळता भाजीपाला, किराणासह अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने पूर्णपणे बंद करून फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे. सकाळपासूनच शहरात पालिकेच्या घंटागाडीच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी शहरातील मुख्य रस्ते सील केले आहेत. रस्त्यावर विनाकारण कोणी फिरू नये अशा सूचना वारंवार देण्यात येत होत्या.
मलकापूर : शासनाचे लावलेल्या निर्बंध मंगळवारपासून आणखीनच कठोर करण्यात आले. मलकापुरातील मेडिकल दुकाने वगळता भाजीपाला, किराणासह अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने पूर्णपणे बंद करून फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे. सकाळपासूनच शहरात पालिकेच्या घंटागाडीच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी शहरातील मुख्य रस्ते सील केले आहेत. रस्त्यावर विनाकारण कोणी फिरू नये अशा सूचना वारंवार देण्यात येत होत्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेले कडक निर्बंध मंगळवारपासून आणखीन कठोर करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजता तहसीलदार अमरदिप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील नाकाबंदीची पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी शिवछावा चौकात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून चौकशी करण्यात येत होती. बी. आर. पाटील यांनी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांचा गाड्या जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच विनाकारण रस्त्यांवर फिरणारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार येथील शिवछावा चौकात पोलीस उपनिरिक्षक सदाशिव स्वामी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत सबळ पुराव्याअभावी फिरणाऱ्या तेरा दुचाकीस्वारांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. बँकिंग कर्मचारी व इतर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचे आयकार्ड तपासणी करूनच पूर्णपणे खात्री झाल्यानंतरच त्यांना सोडले जात होते.
शहरात प्रभागनिहाय अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुग्धालय, किराणामाल, मटन-चिकन विक्री करणाऱ्या दुकानदारांची नोंदणीकृत यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्या दुकानदारांनी संबंधित प्रभागांमध्येच घरपोच सेवा देण्यासाठी बाहेर पडावे. यादीतील नाव व आधारकार्ड हेच ओळखपत्र असून पोलिसांनी अडवल्यास यादीतील नाव व आधार कार्ड दाखवावे. कोणत्याही कारणांसाठी गर्दी करू नये.
- राहुल मर्ढेकर,
मुख्याधिकारी
प्रत्येक गावातील शेतकरी व अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी त्यात्या गावातच सेवा द्यावी. उगीच इतर गावात जाऊ नये. शहरातही आपापल्या गल्लित, मोहल्ल्यात व पेठेतच घरपोच सेवा द्यावी. कोरोनाला थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने शासनाच्या नियमांचे पालन करावे.
- अमरदीप वाकडे,
तहसीलदार, कराड
कोरोनाला थांबवण्यासाठी शासन, पालिका प्रशासन व पोलिस कठोर नियमांची अमलबजावणी करत आहेत. मात्र नागरिकांनीच बाहेर न पडून शासनाला सहकार्य करावे. योग्य कारणांशिवाय फिरणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.
- बी. आर. पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक