आशियाई महामार्गामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेला महत्त्व , एनएच 4 बनला एएच 47 : ग्वाल्हेर ते बेंगलोरपर्यंतचा प्रवास; दोन हजार किलोमीटरचे अंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:34 AM2018-02-01T00:34:29+5:302018-02-01T00:38:10+5:30
नितीन काळेल ।
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग झाल्यामुळे तीन राज्ये दळणवळणाच्या दृष्टीने आणखी जवळ येणार आहेत. सुमारे दोन हजार किलोमीटरचा हा मार्ग असून, ग्वाल्हेर ते बेंगलोरपर्यंत आहे. महामार्गामुळे दळणवळण सुलभ होणार असून, सातारा जिल्ह्यातील बाजारपेठेलाही याचा लाभ होणार आहे.
रस्ते हे विकासाचा केंद्रबिंदू असतात. रस्ते चांगले असतील तर रहदारी, दळणवळण सुलभ होऊन जाते. तसेच चांगल्या रस्त्यामुळे गावे, शहरे आणखी जवळ येतात, असे म्हटले जाते. सातारा जिल्ह्यातही चांगले रस्ते होऊ लागले आहेत. या जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. त्यापैकी अनेक मार्गांची कामे सुरू झाली आहेत. हे महामार्ग अनेक गावे आणि शहरांना जोडण्याचे काम करीत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जातो.
या मार्गावरील वाहतूक जलद व्हावी, दळवळणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात, यासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. पूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग चार म्हणून ओळखला जात होता. आता याला आशियाई महामार्ग ४७ हे नाव मिळाले आहे. हा मार्ग तीन राज्यांतून जात आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे हा महामार्ग सुरू होत असून शिवपुरी, गुणा, देवास इंदौर (मध्यप्रदेश), नाशिक, ठाणे, मुंबई, पनवेल, पुणे, सातारा, कºहाड, कोल्हापूर (महाराष्ट्र) आणि कर्नाटकातील निपाणी, बेळगाव, धारवाड, हुबळी, दावणगिरी असा बेंगलोरपर्यंत जात आहे.
या आशियाई महामार्गाचे सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी काम सुरू आहे. सध्या हा महामार्ग सहापदरी होत आहे. यामुळे वाहतूक वेगाने होणार आहे. तसेच मोठमोठी शहरे काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. दळणवळणाच्यादृष्टीने आशियाई महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. तसेच या महामार्गाची देखभालही त्वरित होणार आहे. शिरवळ ते शेंद्रे हे अंतर पुणे विभागाच्या अंतर्गत येत असून, या अंतरातील कामे जूनपर्यंत पूर्ण होतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातूनही हा महामार्ग जात आहे. जिल्ह्यातील मार्गाचे अंतर हे सुमारे १३० किलोमीटर आहे. या आशियाई महामार्गामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेला महत्व प्राप्त होणार आहे.
कोल्हापूरलाही कार्यालय...
शेंद्रे (सातारा) ते कागल हे अंतर १३२ किलोमीटर इतके आहे. या मार्गावर सहा पदरीकरणाचे काम सुरू नाही. सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू झाले आहे. पुण्यानंतर कोल्हापुरात हे कार्यालय सुरू झाले आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग ४७
पुणे कार्यालयांतर्गत वाढे फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू
शिरवळ ते शेंद्रेपर्यंतचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार
सहापदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढणार
दोन शहरातील दळणवळणासाठी मोठा फायदा