शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व : गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:11 AM2021-02-18T05:11:44+5:302021-02-18T05:11:44+5:30
फलटण : ‘विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे. शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व देऊन आपणास प्रगती करता ...
फलटण : ‘विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे. शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व देऊन आपणास प्रगती करता येते. केवळ खेळात प्रावीण्य मिळवूनही थेट प्रशासकीय सेवेत काम करण्यास संधी मिळते,’ असे उद्गार पुणे प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजी गावडे यांनी काढले.
गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयातील तिसरीत शिकणाऱ्या श्रीराम लहु आडके याने सायकलिंगमध्ये केलेल्या विक्रमी कामगिरीस प्रोत्साहन म्हणून शाळेमार्फत विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, सचिव साधनाताई गावडे, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदणी सेंटरचे अजित कर्णे, शाळेतील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य संदीप किसवे म्हणाले, शाळेने विद्यार्थ्यांना सर्वांगीणदृष्ट्या घडविण्यासाठी अभ्यासाबरोबरच शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रतिवर्षी क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जाते. परंतु लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना या विद्यार्थ्याने स्वतः सायकलिंगचा सराव करून जी कामगिरी केली आहे. ती इतरांना खरेच प्रोत्साहित करते. अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व दिले पाहिजे.’
कर्णे यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून होणाऱ्या अशा प्रकारचे रेकॉर्डचे संकलन करून ते नोंद केले जाईल असे सांगितले. गिरीधर गावडे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश सस्ते यांनी आभार मानले.