मेक्सिकोतील गव्हाचे वाण संशोधनासाठी महाबळेश्वरात!, काळा व नारंगी तांबेरा रोगाची होणार चाचणी

By सचिन काकडे | Published: March 21, 2023 02:16 PM2023-03-21T14:16:41+5:302023-03-21T14:17:27+5:30

महाबळेश्वरचे वातावरण गव्हावर पडणाऱ्या तांबेरा रोगावरील विविध प्रकारचे संशोधन करण्यासाठी पोषक

In Mahabaleshwar for research on wheat varieties in Mexico, Black and orange copper disease will be tested | मेक्सिकोतील गव्हाचे वाण संशोधनासाठी महाबळेश्वरात!, काळा व नारंगी तांबेरा रोगाची होणार चाचणी

मेक्सिकोतील गव्हाचे वाण संशोधनासाठी महाबळेश्वरात!, काळा व नारंगी तांबेरा रोगाची होणार चाचणी

googlenewsNext

सचिन काकडे

सातारा : महाबळेश्वरच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रात यंदा भारतातूनच नव्हे, तर मेक्सिको या देशातूनही गव्हाचे वाण संशोधनासाठी आले आहेत. या वाणांची संशोधन केंद्रात लागवड करण्यात आली असून, संशोधनानंतर नारंगी व काळा तांबेरा रोग प्रतिकारक्षमता असलेल्या वाणाचा अहवाल मेक्सिकोतील 'सिमिट' संस्थेला पाठविला जाणार आहे.

महाबळेश्वरचे वातावरण गव्हावर पडणाऱ्या तांबेरा रोगावरील विविध प्रकारचे संशोधन करण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे या ठिकाणी १८ मार्च १९४१ रोजी गहू गेरवा संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. दरवर्षी भारतातून सुमारे चार हजार गव्हाचे वाण काळा व नारंगी तांबेरा प्रतिबंध चाचणीसाठी या संशोधन केंद्रात येत आहेत.

जागतिक पातळीवर गहू आणि मका पिकावर संशोधन करणारी ‘सिमिट’ ही संस्था मेक्सिको या देशात कार्यरत आहे. या संस्थेतूनही कोरोनानंतर प्रथमच गव्हाचे वाण रोग प्रतिकारक्षमता आजमावण्यासाठी महाबळेश्वरच्या केंद्रात आले आहेत. याठिकाणी लागवड करण्यात आलेल्या गव्हावर काळ्या व नारंगी तांबेरा रोगाचा कसा व किती परिणाम होतो, याचे अचूक निरीक्षण व संशोधन सध्या सुरू आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर तांबेरा रोग प्रतिकारक्षमता असलेल्या वाणाचा अहवाल संस्थेला पाठविण्यात येणार असल्याची माहिती कनिष्ठ गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशिर, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. संदीप दिघुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अचूक निरीक्षण अन् संशोधन...

  • भारतात सिमला, वेलिंग्टन आणि महाबळेश्वर या तीनच ठिकाणी तांबेरा रोगाबाबत संशोधन केले जाते. येथील काचगृहात काळा व नारंगी तांबेराच्या प्रत्येकी २५ प्रजाती जतन करून ठेवल्या आहेत. गव्हावरील विविध प्रायोगिक चाचण्या दरवर्षी शेतकऱ्यांना दाखविल्या जातात.
  • गेल्या आठ दशकांहून अधिक काळ या केंद्राद्वारे तांबेरा रोगाचे अचूक निरीक्षण केले जात असून, आजवर दोन लाखांहून अधिक पूर्व प्रसारित गव्हाच्या वाणांवर तांबेरा प्रतिबंध चाचणी करण्यात आली आहे.

विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर हे भारतातील गव्हावरील तांबेरा रोगावर संशोधन करणारे महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. येथे अखिल भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था, कर्नाल (हरयाण) येथून दरवर्षी गव्हाच्या पूर्व प्रसारित वाणाची काळा व नारंगी तांबोरासाठी दरवर्षी चाचणी घेतली जाते. - डॉ. विक्रांत साळी, कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ

Web Title: In Mahabaleshwar for research on wheat varieties in Mexico, Black and orange copper disease will be tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.