'अतिरिक्त भूसंपादन शेतकऱ्यांवर अन्यायकारक', फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 06:03 PM2022-11-07T18:03:45+5:302022-11-07T18:04:05+5:30

मिरगाव, नांदल व ढवळेवाडी या गावातील जमिनी कवडीमोल भावात घेऊन मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांसाठी दिल्या जाणार

In Phaltan taluka, the process of land acquisition of agricultural land in the villages of Mirgaon, Nandal and Dhavalewadi is underway | 'अतिरिक्त भूसंपादन शेतकऱ्यांवर अन्यायकारक', फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

'अतिरिक्त भूसंपादन शेतकऱ्यांवर अन्यायकारक', फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Next

मलटण : फलटण तालुक्यात सुरवडी एमआयडीसीसाठी आधीच अत्यल्प दरात शेतजमिनी भूसंपादित केल्या आहेत. यानंतर अतिरिक्त भूसंपादन करण्याची प्रक्रिया मिरगाव, नांदल व ढवळेवाडी या गावांमध्ये शासनातर्फे सुरू आहे. हे अतिरिक्त भूसंपादन शेती व शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे असून, हजारो अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत, शेतीपूरक व्यवसायही बंद करून मोलमजुरी करावी लागेल, यामुळे या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनास आमचा तीव्र विरोध आहे, असे फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी सांगितले.

या अतिरिक्त भूसंपादनास विरोध करण्यासाठी तिन्ही गावांतील शेतकरी व महिलांनी फलटण येथील नाना पाटील चौक ते उपविभागीय कार्यालय असा मोर्चा काढला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या गावांतील शेतकऱ्यांकडे या जमिनी व्यतिरिक्त जगण्यासाठी इतर कोणतेही साधन उपलब्ध नाही. दुग्धव्यवसाय व कुक्कुट व्यवसायही याच जमिनींना पूरक व्यवसाय म्हणून चालतात, असे असताना अतिरिक्त एमआयडीसीसाठी ही जमीन संपादित झाल्यास शेकडो कुटुंब भूमिहीन होणार आहेत. या पूर्वीही नीरा-देवधर प्रकल्पाच्या पुनर्विकास कामी येथील जमिनी संपादित केल्या गेल्या तसेच सुरवडी येथील एमआयडीसीसाठी अनेक शेतकऱ्यांनी जमिनी देऊन त्यांना अत्यल्प किंमत मिळाली आणि नोकरीचा लाभ आजही या शेतकऱ्यांना मिळाला नाही.

दोनदा भूसंपादन होऊन आता ज्या जमिनी शिल्लक आहेत, त्या बहुतांश विहीर बागायत तसेच नीरा-देवधर लाभ क्षेत्रांत येणाऱ्या आहेत. मग या जमिनीचे भूसंपादन कशासाठी केले जात आहे. तिन्ही गावांपैकी कोणत्याही ग्रामपंचायतीने अशी मागणी केलेली नाही अथवा ठराव मंजूर केलेला नाही, या उलट हे भूसंपादन होऊ नये असाच ठराव मंजूर केलेला असताना भूसंपादन करण्याचा अट्टाहास शासन का करत आहे, या भूसंपादनास तीव्र विरोध असून, वेळ पडल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यावेळी मोर्चास सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये ‘ रासप’चे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विश्वासराव भोसले, अशोकराव जाधव, बजरंग गावडे, शिवसेना फलटणचे प्रदीप झणझणे, विराज खराडे, अमोल सस्ते, नितीन जगताप, तुकाराम गायकवाड, सुशांत निंबाळकर, युवराज शिंदे, राजाभाऊ नागटिळे, अशोक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

कवडीमोल भावात जमिनी....

मिरगाव, नांदल व ढवळेवाडी या गावातील जमिनी कवडीमोल भावात घेऊन मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांसाठी दिल्या जाणार आहेत, आधी झालेल्या भूसंपादनातही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात घेऊन नोकरीचे आमिष दाखवले, मात्र असा कोणताही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.

Web Title: In Phaltan taluka, the process of land acquisition of agricultural land in the villages of Mirgaon, Nandal and Dhavalewadi is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.