लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिद्धनाथ रथोत्सव उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 07:51 PM2023-12-13T19:51:10+5:302023-12-13T19:51:29+5:30
रथोत्सवामुळे म्हसवड नगरी गुलालमय झाली होती.
म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रथोत्सवामुळे म्हसवड नगरी गुलालमय झाली होती.
महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव उत्साहात पार पडला. उत्सवमूर्ती सालकरी महेश गुरव यांच्या घरून वाजत-गाजत रथामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास बसवण्यात आल्या. यावेळी मानाच्या सासन काठ्यांची भेट झाल्यावर श्रींच्या मूर्तींची रथातून मिरवणूक काढण्यात आली. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून श्रीमंत अजितराव राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दीपसिंह राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, विश्वजित राजेमाने तसेच माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार विकास अहीर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला.
अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून यावर्षी माण नदीपात्रात पाणी नसल्याने रथ पूर्वापार चालत आलेल्या मार्गाने म्हणजे माणगंगा नदी पात्रातून सातारा-पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिद्धनाथ यांच्या बहिणीस मानकऱ्यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरून खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरून रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
प्रशासनाने भाविकांच्या वाहनांची पार्किंग शहरालगत केल्याने भाविकांना त्रास कमी झाला. तसेच नगरपरिषदेने पाण्याची सोय चांगल्या प्रकारे सोय केली होती. यात्रेत पाच लाखांहून अधिक भाविक आल्याने विविध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर झाल्याने व्यापारी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
चौकट
श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर
दिवाळी पाडव्याच्या दिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह दिवशी श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होऊन आज गुरुवारी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.