घडतंय-बिघडतंय : वारुंजी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्यातच धुसफूस!

By प्रमोद सुकरे | Published: July 12, 2023 10:23 PM2023-07-12T22:23:25+5:302023-07-12T22:23:45+5:30

धूर बाहेर येऊ लागल्याने उलटसुलट चर्चा

In Varunji Gram Panchayat, the rulers are in trouble! | घडतंय-बिघडतंय : वारुंजी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्यातच धुसफूस!

घडतंय-बिघडतंय : वारुंजी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्यातच धुसफूस!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : कऱ्हाड शहरालगत उपनगर म्हणून वारुंजी गावची ओळख आहे. परिणामी, येथील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष कायम लागून राहिलेले असते. येथील ग्रामपंचायतीत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली तरी त्यांच्यातच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्याचा धूरही आता बाहेर यायला लागला आहे. त्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

वारुंजी ग्रामपंचायतीत एकूण १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. पैकी १२ काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर ३ सदस्य भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले गटाचे मानले जातात. निवडणुकीनंतर पहिल्यांदा काँग्रेसच्या शकुंतला पवार यांची सरपंच म्हणून तर राष्ट्रवादीचे नेते आमदार बाळासाहेब पाटील यांचे भाचे अनूज पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मध्यंतरी पहिल्या सरपंचांनी राजीनामा दिला त्या जागी सुप्रिया पाटील यांची नव्याने सरपंच म्हणून निवड करण्यात आली. तर उपसरपंच अनूज पाटीलच राहिले. आता सत्ताधारी गटातील अनेकांना उपसरपंच व्हावे, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच ही धुसफूस सुरू झाल्याचे बोलले जाते. त्यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते नामदेव पाटील यांच्याकडे ही खदखद व्यक्त केल्याचे समजते. आता ते काय निर्णय घेणार? हे पाहावे लागेल.

उपसरपंचांच्या विरोधात अर्ज..
उपसरपंच अनूज पाटील यांच्या विरोधात तब्बल १० सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे एक अर्ज दाखल केला आहे. त्यात अनूज पाटील उपसरपंच पदाचा गैरवापर करीत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.

इथून झाली पाणी मुरायला सुरुवात...
वारुंजी ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली आहे; पण त्याच्या भूमिपूजनाचे वारुंजीत दोन स्वतंत्र नारळ फुटले. नामदेव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तर उपसरपंच अनूज पाटील यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दुसरा कार्यक्रम घेतला.

अन् समीकरणे बदलायला लागली..
ग्रामपंचायतीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे १२ तर भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे गटाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीतच धुसफूस सुरू झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वारुंजीतील कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबतच भाजपच्या गटाचे सदस्यही कार्यक्रमाला हजर दिसले.

भविष्यातील राजकारणावर परिणाम...
वारुंजी गाव जिल्हा परिषद गटातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते. नजीकच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे चित्र आहे; पण वारुंजीतील या धुसफुसीचे पडसाद त्यावेळी त्या निवडणुकीत उमटले तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: In Varunji Gram Panchayat, the rulers are in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.