दूध मापनात अचुकता येणार, इलेक्ट्रॉनिक काटे बसवण्याचे आदेश
By दीपक देशमुख | Published: November 18, 2022 12:23 PM2022-11-18T12:23:35+5:302022-11-18T19:01:40+5:30
दहा ग्रॅम अचुकेचे उपकरण बसवल्यास किमान ९० ग्रॅमची तफावत होणार नाही
सातारा : दूध संकलन केंद्रांतील सध्याचे इलेक्ट्रॉनिक काटे हे १०० ग्रॅमची अचुकता दर्शवतात. यामुळे दुधाच्या मापनात तफावत येवून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. यामुळे दहा ग्रॅमचे अचुकतेचे इलेक्ट्रॉनिक काटे बसवण्याचे आदेश वैध मापन शास्त्र विभागाने दि. १२ रोजी जारी केले असून १ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे दुध मापनात अचुकता येणार आहे. तरीही वेळोवळी इलेक्ट्रॉनिक काट्यांची अचानक तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सद्यस्थितीत दुग्ध संकलन केंद्रांवर दूध खरेदी आणि विक्रीसाठी १०० ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे दूध मापनात तफावत येत असल्याच्या तक्रारी दुध उत्पादकांकडून होत होत्या. त्या अनुषंगाने राज्यातील विविध दुग्ध संकलन केंद्रांवर दूध खरेदी-विक्रीकरीता सध्याच्या मापन विषयक कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने दोन समित्या गठीत करण्यात आल्या होत्या.
या अभ्यास समित्यांनी याबाबत अभ्यास करून प्रस्तावीत केल्यानुसार ज्या दुग्ध संकलन केंद्रांवर दूध मापनासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर करण्यात येतो, त्याठिकाणी १० ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय राज्याच्या महाराष्ट्र वैधमापन शास्त्र विभागाच्या अंमलबजावणीने केला. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
दहा ग्रॅम अचुकेचे उपकरण बसवल्यास किमान ९० ग्रॅमची तफावत होणार नाही. तथापि, अनेकदा या इलेक्ट्रॉनिक काट्यांमध्ये छेडछाड होवू शकते. यामुळे वैध मापन विभागने अचानक छापे टाकून वजन काट्यांची तपासणी करावी. - जोतीराम जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तासगाव