बाजारतळाची जागा अपुरी अन् रस्त्यावरच मिळते तरकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:23+5:302021-02-12T04:37:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरेगाव शहरातील आठवडा बाजाराची जागा दिवसेंदिवस अपुरी पडू लागली आहे. आझाद चौक ते जुनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरेगाव शहरातील आठवडा बाजाराची जागा दिवसेंदिवस अपुरी पडू लागली आहे. आझाद चौक ते जुनी पेठ चौक या दरम्यान प्रमुख जिल्हा मार्गावर शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना बसावे लागत आहे. बाजारात बसण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने दर सोमवारी जागेवरून छोट्या-मोट्या तक्रारी उद्भवत असून, त्याला वादाचे स्वरूप येत आहे.
कोरेगाव हे तालुक्याचे मुख्यालय असून, येथील बाजार हा सर्वसामान्यांबरोबरच शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी संजीवनी ठरत आला आहे. सोमवारी भरणाऱ्या या बाजारात कोरेगावसह लगतच्या तालुक्यातील लोकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली असते. नगरविकास विभागाच्या निधीतून बाजारतळाची पुनर्बांधणी करण्यात आली असून, बाजार कट्टे बांधण्यात आले आहेत. हे कट्टे बांधत असताना बाजारतळाचे क्षेत्रफळ विचारात न घेता, तांत्रिक बाजू न पाहता, निधी वापरणे हाच उद्देश ठेवून कट्टे बांधण्यात आले. आता मात्र हे कट्टे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी बनले आहेत.
साधारणत: एक हजारांहून अधिक विक्रेते, शेतकरी शेतीमालासह विविध साहित्य विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे बाजारतळाची जागा अपुरी पडू लागली आहे. जिहे-कठापूर-खेड-नांदगिरी या प्रमुख जिल्हामार्गावर आणि शहरांतर्गतच्या रस्त्यांवर विक्रेते विक्रीसाठी बसत आहेत. ही जागा आता कमी पडू लागली आहे. ग्राहकांच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने बाजारतळाच्या चारही बाजूस जेथे मोकळी जागा असेल तेथे वाहने लावली जात आहेत. तेथेच रिक्षाथांबे देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी दिवसभर शहरांतर्गत वाहतूक कोंडी होत असून, त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.
(कोट)
कोरेगाव आठवडा बाजारात शेतमाल विक्रेत्यांची संख्या बाजारागणिक वाढत चालली आहे. जागा अपुरी पडत आहे, हे वास्तव आहे; मात्र त्याला दुसरा कोणता मार्ग नाही. शासनाच्या मालकीच्या जागा उपलब्ध होतात का? हे पाहिले जाईल. त्यानंतर याविषयी निर्णय घेतला जाईल.
- मंदा किशोर बर्गे, उपनगराध्यक्षा
(कोट)
सोमवारी आठवडा बाजारादिवशी जागेवरून वादावादी होते. त्याचे पर्यवसान भांडणात होते. व्यवसायाला एक दिवस मिळतो, त्यामुळे सकाळी लवकर येऊन जागा पकडणे हाच एकमेव पर्याय असतो. नगरपंचायतीने बाजारात विभागवार रचना करून जागा वाटप केल्यास विक्रेत्यांची सोय होईल.
- पुरुषोत्तम खांडेकर, फळ विक्रेता, कोरेगाव.
(चौकट)
चोरीच्या घटना वाढल्या...
व्यापाऱ्यांकडू रस्त्यावरची मोठी जागा अडविली जाते. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन मोबाईलसह इतर मौल्यवान साहित्याची चोरी होते. त्यामुळे अ महिलावर्ग आता बाजाराच्या बाहेरील बाजूस खरेदी करणे पसंत करतात. मुख्य बाजारात कट्ट्यावर बसण्यापेक्षा बाहेरील बाजूस बसणे शेतकरी पसंत करत आहेत. त्यामुळे रस्त्याकडेला गर्दी वाढत चालली असून, बाजारतळाकडे दुर्लक्ष होत आहे.
फोटो : ११ कोरेगाव
कोरेगाव शहरातील बाजारतळाची जागा आठवडा बाजारासाठी अपुरी पडत असल्याने विक्रेते रस्त्यावर बसून भाजी विक्री करत आहेत.
लोगो : रस्त्यावरचा आठवडा बाजार