सातारा जिल्ह्यात अपुरा पाऊस; पेरणी अवघी १४ टक्केच, शेतकरी चिंतेत
By नितीन काळेल | Published: July 6, 2023 07:14 PM2023-07-06T19:14:27+5:302023-07-06T19:14:59+5:30
पेरणीला वेग येण्यासाठी सर्वत्रच पावसाची आवश्यकता
सातारा : जिल्ह्यात उशिरा पाऊस सुरू होणे आणि अजूनही अनेक भागात ओढ दिल्याने खरीप हंगाम पेरणीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत फक्त १४ टक्के क्षेत्रावरच पेर झाली आहे. तर पूर्व भागात अजूनही पेरणीला वेग आलेला नाही. त्यामुळे यावर्षी १०० टक्के पेरणी होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. साधारणपणे तीन लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. यामध्ये भात, बाजरी, सोयाबीन, भुईमूग हीच मुख्य पिके असतात. यावर्षी जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १५ हजार १९०, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर आहे. तर खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे ७४ हजार ८०० हेक्टर आहे. याचबरोबर तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफूल यांचे क्षेत्र कमी आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करतात; पण यंदा मान्सूनचा पाऊसच जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झाला. सुरुवातीला पूर्व आणि पश्चिम भागात हजेरी लावली; पण नंतर पश्चिम भागातच जोर धरला. आतापर्यंत पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असलातरी पूर्वेकडे दडी आहे. यामुळे याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. आतापर्यंत फक्त १४ टक्केच पेरणी झालेली आहे. याचा अर्थ ४० हजार हेक्टरवरच पेर आहे. त्यामुळे पेरणीला वेग येण्यासाठी सर्वत्रच पावसाची आवश्यकता आहे.