प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन लटकले..!
By admin | Published: July 31, 2015 09:26 PM2015-07-31T21:26:08+5:302015-07-31T21:26:08+5:30
वडूज : गत वर्षापासून इमारत वापराविना; फर्निचरच्या वादाचे कारण?
वडूज : खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील तहसील कार्यालय परिसरातील सव्वाचार कोटी रुपये खर्च करुन बांधलेली प्रशासकीय इमारत उद्घटनाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या ही इमारत वापराविना पडून आहे. जुने की नवे फर्निचर वापरायचे, असा वाद यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. वडूज येथील या इमारतीत सुमारे सहा ते सात कार्यालये आपला कार्यभार सांभाळू शकतात. अशी ही प्रशस्त इमारत आजअखेर वापराविना पडून आहे. तहसील कार्यालयातील जुने फर्निचर त्याठिकाणी न्यावे की नवीन फर्निचर तयार करावे, या अंतर्गत वादात ही इमारत पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत देखभाल असणाऱ्या या प्रशासकीय इमारतीच्या कामाला सुरुवात २ जानेवारी २०१२ रोजी झाली; परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वीच रंगरंगोटी करून ही प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली आहे. इमारतीच्या फर्निचरचा प्रश्न कायमपणे उभा आहे. कारण प्रथम १९ लाख नंतर ४७ लाख आणि सध्या ७८ लाखांवर खर्च पोहोचल्यामुळे या प्रस्तावाला मंत्रालयातून मंजुरी मिळेल का? हा यक्षप्रश्न लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पडला आहे. नवीन फर्निचरचा प्रस्ताव जिल्हा पातळीवर बरेच दिवस झाले अडकून पडला आहे. त्यामुळे ही इमारत सर्वसामान्यांसह कर्मचाऱ्यांना किती काळ वाट पाहायला लावणार आहे, याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे.
तालुक्याचे राजकीयदृष्ट्या त्रिभाजन झाल्याने सर्वसामान्य जनतेसह राजकीय नेत्यांच्यात प्रचंड उदासीनता आहे. नागरिकांसाठी एकाच ठिकाणी सर्व कार्यालये असावीत, या हेतूने इमारत बांधण्यात आली. मात्र, लोकप्रतिनिधींची उदासीनता की अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी? या गर्तेत इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)
आगारासमोर बसस्थानक होणार?
खटाव तालुक्यातील सर्वच महत्त्वपूर्ण शासकीय कार्यालये, दवाखाने, शाळा, कॉलेज, डेपो वडूज नगरीत आहेत. तालुक्यातून ये-जा करणाऱ्यांची वर्दळ प्रचंड प्रमाणात असून, सध्या असलेल्या बसस्थानकात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वारंवार एस.टी. चालक व खासगी वाहतूक करणारे यांच्यात तंटे होत असतात. त्यामुळे प्रशस्त जागेत असणाऱ्या वडूज डेपोसमोर प्रशस्त जागा वापराविना पडून आहे. त्या ठिकाणी सुसज्ज बसस्थानकाचा प्रस्ताव ही जिल्हापातळीवर धूळखात पडला आहे.