दत्त शुगरच्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:31+5:302021-05-08T04:40:31+5:30
फलटण : साखरवाडी श्री दत्त इंडिया शुगर आणि श्री दत्त फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ६५ बेडच्या कोरोना केअरचे उद्घाटन ...
फलटण : साखरवाडी श्री दत्त इंडिया शुगर आणि श्री दत्त फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ६५ बेडच्या कोरोना केअरचे उद्घाटन विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, दत्त इंडियाचे जितेंद्र धरू, प्रशासनाधिकारी अजित जगताप, माजी सभापती शंकर माडकर, कामगार युनियन अध्यक्ष राजेंद्र भोसले, मच्छिंद्र भोसले यांच्यासह कंपनीचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. फलटण शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पोलीस प्रशासन योग्य दक्षता घेऊन सुरक्षितता सांभाळण्यात यशस्वी होत असताना जनतेने प्रशासनाचे आवाहन लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयांत गर्दी करू नये, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन करतानाच फलटण शहर व आठ गावांतील प्रतिबंधित क्षेत्र अन्य गावांत वाढू नये यासाठी विनाकारण फिरणे टाळा, घरातच राहा, नियम पाळा, असे आवाहन रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
श्री दत्त फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहन करतानाच भविष्यात या फाउंडेशनच्या माध्यमातून साखरवाडी व परिसराला विविध सुविधा, प्रामुख्याने वैद्यकीय, खेळ, शिक्षण विषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार असल्याचे कंपनीचे संचालक जितेंद्र धरू यांनी सांगितले. प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांनी स्वागत केले.
०७फलटण-दत्त शुगर
साखरवाडी येथे दत्त शुगरने उभारलेल्या कोरोना केअर केंद्राचे उद्घाटन रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. शिवाजीराव जगताप, जितेंद्र धरू उपस्थित होते. (छाया : नसीर शिकलगार)