कासच्या नवीन जलवाहिनीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, सातारा शहर, उपनगराला मुबलक पाणी मिळणार
By सचिन काकडे | Published: January 19, 2024 04:47 PM2024-01-19T16:47:14+5:302024-01-19T16:47:45+5:30
प्रकल्प दोन वर्षात मार्गी : उदयनराजे यांची माहिती
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या नुतन जलवाहिनीच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात आले. या प्रकल्पासाठी शासनाच्या अमृत २.० योजनेतून १०२ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला असून, येत्या दोन वर्षात ही योजना पूर्णत्वास येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
सोलापूर येथे शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आवास योजना, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापण आदी योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता, यावे यासाठी सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सातारा विकास व नगरविकास आघाडीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटन सोहळा व पंतप्रधानांचे भाषण झाल्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शहराचा वाढता विस्तार व भविष्यातील पाणीमागणी पाहता कास धरणाची उंची वाढविण्यात आली. या कामामुळे धरणाचा पाणीसाठा पाच पटीने वाढला आहे. पुढील टप्पा जलवाहिनीचा असून, २७ किलोमीटर लांब जलवाहिनीसाठी शासनाच्या अमृत २.० योजनेतून १०२ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेवर १६ दशलक्ष क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र व एक मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प साकारला जाणार आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर पालिकेच्या वीजबिलात वार्षिक ४ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्णत्वास येणार असून, सातारा शहर व उपनगराला मुबलक पाणी मिळेल.