लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; "नव्या पिढीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलणार" - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:21 PM2024-02-16T22:21:23+5:302024-02-16T22:25:00+5:30
नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
लोणंद : येथील कृषी महोत्सव शेतकऱ्यांना नवीन दिशा देणारा महोत्सव आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन नवीन पिढीतील नवे नेतृत्व निर्माण करण्याचा मनोदय आहे. नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
लोणंद येथील बाजार तळावर भरविण्यात आलेल्या शरद कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, अभयसिंह जगताप, सारंग पाटील, प्रवीण गायकवाड, लक्ष्मण माने, दशरथ माने, सुनील गव्हाणे, सत्यजित पाटणकर, दीपक पवार, प्रभाकर देशमुख, सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, सत्ता येते सत्ता जाते, सत्ता ही कायमची नसते; पण विचार कायम राहतात. देशाला पुढे नेणारा कार्यक्रम राबविण्याची गरज असताना सत्ताधारी याकडे ढुंकूणही पाहत नाहीत. भारतीय संसद ही लोकशाहीची महत्त्वाची संस्था असताना पंधरा दिवसांच्या अधिवेशन काळात देशाचे पंतप्रधान फक्त एका तासासाठी येतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी अधिवेशन काळात संसदेत एक दिवसही चुकविला नाही.
रोहित पवार म्हणाले, हा महोत्सव होऊ नये म्हणून फोनाफोनी करणाऱ्या स्थानिक आमदारांना जनता अद्दल घडवेल. केवळ टीका करून शेतकऱ्यांचे हित न जपणाऱ्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकविणार आहे.
डॉ. नितीन सावंत म्हणाले, खंडाळा तालुक्याचा पाणी प्रश्न व बेरोजगारीसंदर्भातील प्रश्नाबाबत आमदार अयशस्वी झाले आहेत. संपूर्ण सातारा जिल्हा हा कायम आपल्या सोबतच राहणार असून, भलेही पक्ष आणि पक्ष चिन्ह जरी हिसकावून घेतले असले, तरी साहेब तुम्हीच आमचा पक्ष, तुम्ही सांगाल तेच आमचं धोरण, तुम्ही बांधाल तेच आमचं तोरण. खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली.
कार्यक्रमाला अभिजित घोरपडे, रामदास कांबळे, नंदकुमार घाडगे, दत्ता चव्हाण, चंद्रकांत ढमाळ, प्रा. एस. वाय. पवार, नगरसेविका तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, दीपाली नीलेश शेळके, माजी नगरसेविका शैलजा खरात, अजित यादव, योगेश क्षीरसागर व डॉ. नितीन सावंत विचार मंचचे अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
विचार महत्त्वाचा वयाचे काय ?
माझे वय झाले म्हणून काय झाले, त्यांनी काय बघितलेय... वयाची चिंता तुम्ही करू नका, देशाने अनेक नेते पाहिलेत. मोरारजीभाई देसाई वयाच्या ८५ व्या वर्षी प्रधानमंत्री झाले. आपली विचारधारा जर भक्कम असेल तर वय आडवे येत नाही.