मुलाच्या लग्नात होणाऱ्या खर्चाला घातला आळा, या पैशातून शाळेत राबणार प्रोत्साहनपर उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 07:06 PM2022-01-01T19:06:17+5:302022-01-01T19:13:04+5:30
लग्न समारंभातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थांना प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यासाठी रोख निधी उपलब्ध करून दिल्याने गावात नवी चालना मिळाली आहे.
खंडाळा : आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात नवनवीन बदल घडून येत आहेत. काळानुरूप नव्या भारताची नवी स्वप्ने साकार करण्यासाठी शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाळांना प्रेरणा मिळावी, यासाठी लग्न समारंभातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थांना प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यासाठी रोख निधी उपलब्ध करून दिल्याने गावात नवी चालना मिळाली आहे.
म्हावशी (ता. खंडाळा) येथील नागरिक अरुण शिंदे यांना शिक्षणाविषयी विशेष आवड आहे. आपल्या हातून गावातील शाळेसाठी काहीतरी सकारात्मक काम व्हावे ही त्यांची मनस्वी इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी मुलाच्या लग्नात होणाऱ्या खर्चाला आळा घालून गावातील प्राथमिक शाळेसाठी रोख २५ हजारांची देणगी उपलब्ध करून दिली. या रकमेची ठेव पावती करून त्यातून येणाऱ्या वार्षिक व्याजातून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे मुलांमध्ये बौद्धिक स्पर्धा निर्माण होऊन गुणवत्ता वाढीस त्याचा उपयोग होणार आहे.
गावातीलच एका दातृत्वाने हा नवीन पायंडा सुरू केल्याने लोकांना प्रेरणा मिळणार आहे. शाळेला इतर लोकांच्या माध्यमातून भौतिक गरजा पूर्ण करणे शक्य होणार आहे. वास्तविक प्राथमिक शाळांचा स्तर उंचावण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यातून असे उपक्रम हे इतरांना प्रेरणादायी ठरणार आहेत.
प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांचा पाया घडला जातो. मुलांमध्ये गुणवत्तेसाठी स्पर्धा वाढली तर त्यांचे जीवनमान उंचावेल. शाळेत हा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी निधी दिला आहे. माझ्या काटकसरीतून सुमारे एक लाख रुपये देणगी देण्याचा मानस आहे. -अरुण शिंदे, ग्रामस्थ, म्हावशीकोट
शाळा हे मंदिर समजून शालेय स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक घटकाने पुढे येणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. शिंदे यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यांचा आदर्श घेऊन इतर पालकांना प्रोत्साहन मिळेल. - महेश राऊत, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती