सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाची संततधार; कोयना धरण पाणीसाठ्यात झाली 'इतकी' वाढ
By नितीन काळेल | Published: June 30, 2023 12:20 PM2023-06-30T12:20:41+5:302023-06-30T12:21:29+5:30
शेतकऱ्यांची पेरणी, लागणीची धांदल
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असून यामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. तर शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ११० आणि महाबळेश्वरला १२८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणातही साठा वाढत असून १२ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.
जिल्ह्यात सहा दिवसांपासून मान्सूनचा पाऊस सक्रीय झाला आहे. पूर्व भाग वगळता पश्चिमेकडे जोरदार पाऊस पडत आहे. चार दिवसांपासून तर संततधार आहे. कोयना, नवजा, तापोळा, बामणोलीसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे लोकांनाही घराबाहेर पडणे अवघड झालं आहे. त्याचबरोबर सूर्यदर्शनही झालेले नाही. संततधार पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत.
परिणामी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ११.९५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या पायथा वीजगृहातूनच १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जाते.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४०४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला आतापर्यंत ५३९ आणि महाबळेश्वरला ७२३ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. त्याचबरोबर पश्चिम भागात धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पाऊस पडू लागलाय. यामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पश्चिमेकडे पाऊस असल्याने शेतकऱ्यांची पेरणी, लागणीची धांदल सुरू आहे. मात्र, पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पेरणी झालेली आहे.