चालकाच्या मोबाईलवर बोलण्याने घेतला बळी, कऱ्हाडजवळील नांदलापूरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 04:19 PM2017-11-11T16:19:32+5:302017-11-11T16:35:34+5:30
रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वृद्धाला क्रेनने चिरडले. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे बसथांब्याजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात घडला अशी अपघातस्थळी चर्चा होती. मारूती आण्णा सावंत (वय ६५, रा. बेघर वसाहत, जखिणवाडी, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
मलकापूर ,दि. ११ : रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वृद्धाला क्रेनने चिरडले. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे बसथांब्याजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात घडला अशी अपघातस्थळी चर्चा होती.
मारूती आण्णा सावंत (वय ६५, रा. बेघर वसाहत, जखिणवाडी, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडहून एक क्रेन (एमएच ०५ झेड ०५२४) शनिवारी दुपारी काले गावाकडे निघाली होती. त्यावेळी उपमार्गावर नांदलापूर येथील बसथांब्याजवळ मारूती सावंत एसटीची वाट पाहत थांबले होते.
क्रेनने काले गावाकडे निघाली असताना त्याचा चालक मोबाईलवर बोलत होता. त्यामुळे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मारूती सावंत यांच्याकडे चालकाचे लक्षच गेले नाही.
परिणामी, सावंत क्रेनखाली सापडले. त्यामध्ये ते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
महामार्ग पोलीस व कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानीही त्याठिकाणी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठवून देण्यात आला.
मोबाईल कानाला.... हातात स्टेअरींग
सध्या मोबाईलवर बोलत कोणतेही वाहन चालवण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. मोबाईलवर बोलत गाडी चालवणारांकडूनच बरेच अपघात घडत आहेत. वाहन चालवण्यासाठी असलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.