भीषण आगीत रेडकाचा होरपळून मृत्यू, न्हावी बुद्रुक येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 07:24 PM2019-05-18T19:24:33+5:302019-05-18T19:25:58+5:30
कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रूक येथील धनगरवाड्यात अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या चार गंजी जळून खाक झाल्या. तर गोठ्यात बांधलेल्या लहान रेडकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दुसरे रेडूक ९० टक्के भाजून जखमी झाले आहे. या भीषण आगीत चार शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रूक येथील धनगरवाड्यात अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या चार गंजी जळून खाक झाल्या. तर गोठ्यात बांधलेल्या लहान रेडकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दुसरे रेडूक ९० टक्के भाजून जखमी झाले आहे. या भीषण आगीत चार शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दि. १६ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास न्हावी बुद्रूक येथील धनगरवाड्यातील कडब्याच्या एका गंजीला अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की, काही वेळेतच बाजूला असलेल्या इतर तीन गंजींनीही पेट घेतला. यामध्ये भाऊ यशवंत बोरकर यांची गंज जळाली, एका रेडकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर एक रेडूक भाजून गंभीर जखमी झाले.
शेजारी असलेल्या शेणखताच्या उकीड्यातील शेणखतही जळून खाक झाले. याबरोबरच मधुकर यशवंत बोरकर, संतोष बाळू बोरकर व शिवाजीराव बोरकर यांच्या प्रत्येकी एक अशा चार कडब्याच्या गंजीची जळाल्या. दरम्यान आगीचे तांडव पाहून अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी जनावरांच्या गोठ्यांमधील इतर म्हशीच्या दोरी कापल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
ग्रामस्थांनी नगरपालिकेशी संपर्क साधल्यानंतर काही वेळातच रहिमतपूर येथील अग्नीशामक बंब घटनास्थळी हजर झाला. प्रयत्नांच्या पराकाष्टा केल्यानंतर सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली. आगीच्या घटनेमुळे धुराचे लोट बाहेर पडल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. माजी सरपंच राहूल निकम यांनी बचाव कार्यासाठी युवकांना घटनास्थळी उभे केले. दरम्यान या लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.