सर्वसमावेशक व्यक्तिमत्व व नेतृत्व : आनंदराव पाटील (नाना )
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:11+5:302021-02-19T04:30:11+5:30
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाचा उल्लेख सातत्याने होतो. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते आदी नेत्यांनी या धरणाचा पाठपुरावा ...
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाचा उल्लेख सातत्याने होतो. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते आदी नेत्यांनी या धरणाचा पाठपुरावा केला. आज हे धरण निसर्गाचा एक चमत्कार म्हणून सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनले आहे. मात्र या कुतूहलाबरोबरच हे धरण होण्यासाठी ज्यांना विस्थापित होण्याची वेळ आली त्यांच्या प्रति अतीव आदर, संवेदना आणि विलक्षण सहानभूती आहे. सार्वजनिक जीवनात विशेषत: पक्षीय राजकारणात जेव्हापासून मी सहभागी झालो, तेव्हापासून आनंदराव पाटील-नानांच्या विषयी जो आदर निर्माण झाला, त्याला मूळ कारण हेच असावे. कोयना खोर्यातील गोजेगांव...या गावची पाटीलकी आनंदराव पाटील यांच्या वडिलांच्याकडे होती आणि त्यांच्या कुटुंबीयांना थोडी थोडकी नव्हे तर सुमारे ३०० एकर जमीन होती. परंतु ही सारी जमीन आज कोयना धरणासाठी संपादीत केल्याने त्यांचे विजयनगर (मुंढे) येथे पुनवर्सन झाले. धरणे आकाराला येतात, परंतु पिढ्यानपिढ्या ज्या मायपांढरीत आपण वावरलो ती मायपांढर सोडताना काय वेदना होतात या कुणालाच शब्दांत रेखाटता येणार नाहीत. हे आख्खं गोजेगाव आज शासनाने जिथं जिथं जागा उपलब्ध करून दिली तिथं वस्तीला गेलंय. कराडपासून नजीक मुंढे गावच्या हद्दीत काही लोकांचं पुनर्वसन झालयं. आज हे गाव नानांच विजयनगर म्हणून सर्वदूर परिचित आहे. सर्व सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, युवक, कामगार असे सर्वांचे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व व नेतृत्व म्हणजे माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) होत.
आनंदराव पाटील पुनर्वसन कुटुंबातील, त्यांचे वडील राघोजी पाटील. कोयना धरणात यांची ३०० एकर जमीन गेली. त्यांचे पुर्नवसन विजयनगर (मुंढे) कराड येथे झाले. अवघ्या महाराष्ट्राला प्रकाशमान करण्यासाठी आणि उभ्या महाराष्ट्रातील यंत्रसामुग्री चालण्यासाठी आनंदराव पाटील यांनी केवढा त्याग केला आहे पहा. हा त्याग त्यांच्या रक्तात आहे हे आजवरच्या त्यांच्या कार्याने आपल्याला ज्ञात होते.
आनंदराव पाटील यांनी ऐन तारुण्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याला वंदन करून कार्याला सुरुवात केली. वयाच्या केवळ १९व्या वर्षी कराड तालुका एन.एस.यू.आय.मध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या २३व्या वर्षी कराड तालुक्याच्या युवक काँग्रेस अध्यक्ष पदावर काम करू लागले. पक्षासाठी वाहून घेतलेल्या नानांनी आपला प्रपंच, संसार, पक्ष समजला. तरुणांना जोडत राहिले. एक एक तरुण सक्रिय करण्यास सुरुवात केली.
काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, तत्कालीन खासदार प्रेमलाताई चव्हाण आनंदरावांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांची पक्षनिष्ठा पाहून त्यांनी आणि जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर सातारा जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. ना म्हणू शकत नाहीत ते नाना कसले? वयाच्या केवळ तिसाव्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यास सुरुवात केली. आता कार्य करण्यासाठी अवघा सातारा जिल्हा मिळाला, कार्य क्षेत्र वाढले. आता फक्त पक्षाचा विचार. वळचणीला घरटे बांधणे शक्यच नाही. सातारा जिल्ह्यातील गांव-वाडी येथे त्यांचे घर. एक एक कार्यकर्ता पक्षाच्या छत्राखाली. राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष आता तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचला.
नानांच्या जिभेवर अमृत; जिल्हाभर मित्रांचे, कार्यकर्त्यांचे मोहळ, सतत सामान्य माणसांच्या सेवेसाठी तत्पर; त्यामुळे नानांच्या भोवताली माणसांचा घोळखा. नानांचे पक्ष कार्य, समाजसेवा हेच ध्येय.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून जे जे कार्यक्रम होत त्या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन नानांच्या समर्थ खांद्यावर. परिश्रमाची पराकाष्ठा म्हणजे आनंदराव पाटील हे समीकरणच. विकासकामाबद्दल बोलायचे, तर जिल्ह्यातील कोणत्याही वाडी-वस्तीवरच्या आडल्या माणसाने यावे. नानांना ना कधीही माहित नाही. त्यांच्या अडचणी दूर होईपर्यंत नाना प्रयत्नांची पराकाष्ठा करणारच ! म्हणूनच की काय दुसर्या पक्षातील लोकही नानांचे हितचिंतक.
सतत राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाची धुरा आनंदरावांच्या खांद्यावरच ! आनंदराव म्हणजे आनंद ! यशस्वी कामाची निश्चिती, पक्षाचे आंदोलन मोर्चे, सत्याग्रहात आनंदराव आघाडीवर. पक्षाच्या अनेक विभागीय शिबिरात आनंदराव पाटील आघाडीवर असत. त्यामध्ये कराड येथे घेण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता शिबिर व महाराष्ट्र प्रदेश व सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर कोयनानगर येथे नानांनी यशस्वीपणे पार पाडले. तसेच प्रकल्पग्रस्त, दुष्काळग्रस्त, आपदग्रस्तांच्या मदतीला आनंदराव धावून जाणारच. आज ही जातात. मागासवर्गीयांचे प्रश्न, कार्यक्रम, महिला सबलीकरणाचे कार्यक्रम, पक्षांचा आदेश शीरोधार्य. सर्वसामान्य दलित, दुरित आपदग्रस्त यांच्या सोडवणुकीसाठी आनंदराव पाटील यांनी अनेक संस्था स्थापन केल्या.
माजी मंत्री आनंदराव चव्हाण, प्रेमलाताई चव्हाण (काकी) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आनंदराव पाटलांची नितांत श्रद्धा. चव्हाण कुटुंबातील जणू ते घटकच बनलेले होते. नानांनी काकींची तर मातेसारखी सेवा केली. त्यांनीही आनंदराव पाटील यांचेवर पुत्रवत प्रेम केले. हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. तसेच दिवंगत मधुआण्णा कुलकर्णी, सदानंद कुलकर्णी आणि विश्वासराव कुलकर्णी व बाळासाहेब कुलकर्णी यांनी राजकारणासोबत समाजकार्यांत तसेच उद्योग व्यवसाय उभारणीस मोलाचे मार्गदर्शन व साथ दिली.
समाजाच्या सेवेची संधी म्हणून आनंदराव पाटलांनी अनेक संस्था स्थापन केल्या. श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालय विजयनगर, महाकाली सहकारी पतसंस्था, विजयनगर (मुंढे), महाकाली मिल्क प्रोसेसर्स प्रा. लि. विजयनगर, महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट, संगम रोजगार सहकारी सोसायटी, केदारनाथ विविध कार्यकारी सोसायटी. अशा अनेक संस्था निर्माण करून यशस्वीपणे चालवित आहेत.
आनंदराव पाटलांच्या उभ्या जीवनाचा चढता आलेख पाहताना बुद्धी थक्क होते. एक पुनर्वसित कुटुंब हे विजयनगरच्या सरपंचपदापासून ते कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष व थेट आमदारपदापर्यंत त्यांनी जी जी पदे भुषविली; त्या त्या पदाचा त्यांनी सन्मान वाढवला. माळावर दगड धोंड्यावर पुनर्वसित लोकांचे जीवनमान उंचविण्यासाठी त्यांनी दहा वर्षांच्या सरपंचपदाच्या कार्यकालात पराकाष्ठा केली. त्या दरम्यान विजयनगर गावाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदर्श गाव म्हणून ग्रामविकास पुरस्कार मिळाला. आज विजयनगरचे नंदनवन झाले आहे. मिळेल त्या पदाचा सन्मान वृद्धिंगत करायचा हा त्याचा धर्म. कोयना प्रकल्प ग्रस्थानांही न्याय, हक्काने सोई-सुविधा पुरविण्याचे कार्य त्यांनी केले. यामुळे त्यांच्या वाट्याला अनेकपदे चालून आलित. नाना म्हणजे आमचे नेतृत्व आणि आमच्या मागण्यापूर्ण होणार हाच जनतेत विश्वास.
वीज कामगार युनियन अध्यक्ष, सातारा जिल्हा दूरसंचार समितीचे सदस्य. कोयना प्रकल्पग्रस्त समिती, सातारा जिल्हा नियोजन समिती, स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य सातारा, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ अशा अनेक संस्थांवर आनंदराव पाटील यांनी काम केले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य तर जनमान्य आहे. कृष्णा खोरेअंतर्गत अनेक प्रश्नांची त्यांनी सोडवणूक केली. विजयनगर व मुंढे येथील एम.एस.सी.बी.ने जमीन संपादित केलेल्या कुटुंबातील अनेक मुलांना नोकरी मिळवून दिली.
आनंदराव पाटील म्हणजे माणसांच्या घोळक्यात वावरणारे नेतृत्व, सतत सामाजिक प्रश्न सोडविण्याची आवड, त्यांच्या आमदारकीचा कालखंड सातारा जिल्ह्याला ज्ञात आहे. विकास निधीच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभरच्या अनेक गावांतील विकासकामांसाठी गती देण्याचे काम केले. अनेक विकासकामांचे ते विकासरत्न आहेत. तसेच महत्त्वाचे अनेक प्रश्न त्यांनी विधान परिषदेमध्ये मांडले.
आनंदराव पाटील यांचा सामाजिक संसार जसा नेत्रदीपक आहे तसा कौटुंबिक संसार ही आदर्शवत आहे.
आनंदराव पाटील यांच्या पुढील राजकीय जीवनास, कार्यास शुभेच्छा. उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.
जगन्नाथ शिंदे, (गुरूजी)
पाचगणी
फोटो :
फोटो :