राष्ट्रवादीत इनकमिंग; भाजपची धडपड !

By admin | Published: November 11, 2016 10:41 PM2016-11-11T22:41:25+5:302016-11-11T23:16:58+5:30

कोरेगाव नगरपंचायत निवडणूक : मनसे व शिवसेनेत शांतता; स्थानिक पातळीवर कॉँग्रेसचा प्रचार

Incoming to NCP; BJP's struggle! | राष्ट्रवादीत इनकमिंग; भाजपची धडपड !

राष्ट्रवादीत इनकमिंग; भाजपची धडपड !

Next

साहील शहा ल्ल कोरेगाव
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह अन्य पक्षांमध्ये उमेदवारी डावलल्याने मोठ्या प्रमाणावर आऊट गोर्इंग सुरू आहे. अनेकांनी पक्षत्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली असली तरी न्यायालयीन लढाईत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे.
शिवसेनेत शांतता असून, त्यांच्या दोन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने तेथे निराशाचे वातावरण आहे. या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची कुरबूर न होता, एका विचाराने उमेदवारी अर्ज भरले गेल्याने पक्षाची ताकद आपोआप वाढली आहे. एकूणच कोरेगावात अन्य पक्षांमध्ये झालेल्या पडझडीमुळे राष्ट्रवादीत इनकमिंग असल्याचे चित्र आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी थेट इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि तेथेच त्यांनी काँग्रेसला खिंडार पाडत त्यांच्याकडील महत्त्वाचे पदाधिकारी असलेल्या प्रतिभा बर्गे, किशोर ना. बर्गे व डॉ. गणेश होळ यांना राष्ट्रवादीत आणले. त्यांच्यापाठोपाठ तरुणांना संधी या भूमिकेवर ते ठाम राहिले आणि उमेदवारी देताना त्यांनी तोच निकष लावल्याने अनेक ठिकाणी नवीन चेहरे पाहावयास मिळाले आहेत.
कॉँग्रेसमधील प्रशांत गायकवाड यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली. आ. शिंदे जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांचा समेट घडवत पक्षसंघटना बळकट करण्यास सुरुवात केल्याने आणि थेट कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे कोरेगावचे माजी सरपंच अ‍ॅड. प्रभाकर बर्गे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी, शिवसेनेचे शहरप्रमुख सिद्धार्थ बर्गे यांनी त्यांच्यासमवेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात आ. शिंदे यांनी धक्कातंत्र सुरू ठेवल्याने काँग्रेस, शिवसेना व भाजपला कार्यकर्त्यांवर ॅविशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
काँग्रेसने सहा महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली असल्याने त्यांना उमेदवारी देताना फारसे अवघड झाले नाही. जेथे नाराज होते, त्यांनी उमेदवारीसाठी पक्षत्याग केला. मात्र, काँग्रेसने कोणतेही नुकसान झाल्याचा इन्कार केला आहे. आम्ही व्यक्तिगत संपर्क, विकासकामे यावरच भर दिला असून, निवडणुकीत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ हे वर्षानुवर्षे चालत आलेली प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने स्थानिक पातळीवर प्रचारावर भर दिला असून, वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली दिसून येत आहे.
युतीची फलनिष्पती फेल !
मनसेने केवळ तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. जेथे ताकद आहे आणि जनमाणसात स्थान आहे, अशाच ठिकाणी उमेदवार दिले असून, जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य प्रभागांमध्ये मनसेचे कार्यकर्ते आपापल्या सोईनुसार निवडणुकीचे काम करत आहेत. शिवसेनेत देखील प्रचंड अस्वस्थता आहे. पालकमंत्री व संपर्क प्रमुख संपूर्ण पॅनेल तयार करण्याचे आदेश देऊन देखील त्यांना सर्वत्र उमेदवार देता आले नाहीत. शिवसेना-भाजप युतीची केवळ चर्चाच होत राहिली, त्यामध्ये फलनिष्पती झालीच नाही. सेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने ऐनवेळी सेना तोंडघशी पडली आहे. एकूणच मनसे आणि शिवसेनेत शांतता आहे.
भाजपची न्यायालयीन लढाई
भाजपने पहिल्यांदाच पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचा चंग बांधला; मात्र संपूर्ण १७ जागांवर त्यांना उमेदवार देता आले नाहीत, एका ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने भाजप अडचणीत आला. उमेदवार अपात्रताप्रकरणी दोन ठिकाणी भाजपने न्यायालयीन लढा दिला; मात्र एकाच ठिकाणी त्यांना यश आले आणि तेथील अवैध ठरलेला उमेदवाराचा अर्ज न्यायालयाने वैध ठरविला. दुसऱ्या लढाईत मात्र भाजपला सपशेल अपयश आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रचार सोडून भाजपला न्यायालयीन लढाई देण्यात वेळ खर्ची घालावा लागत आहे.
 

Web Title: Incoming to NCP; BJP's struggle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.