धोम डाव्या कलव्यावरील पुलाचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:31+5:302021-05-24T04:37:31+5:30
वाई : धोम डाव्या कळव्यावरील वर्षापूर्वी पडलेला गंगापुरी-शेलारवाडी रस्त्यावरील पूल वर्ष उलटले, तरी या पुलाच्या पूर्णत्वास धोम पाटबंधारे ...
वाई : धोम डाव्या कळव्यावरील वर्षापूर्वी पडलेला गंगापुरी-शेलारवाडी रस्त्यावरील पूल वर्ष उलटले, तरी या पुलाच्या पूर्णत्वास धोम पाटबंधारे व संबंधित ठेकेदाराला मुहूर्त सापडत नाही. हा रस्ता गंगापुरी-एमआयडीसी जोडणारा असल्यामुळे महत्त्वाचा आहे. एमआयडीसी, शेलारवाडी व गंगापुरी येथील नागरिक, कामगार व शेतकऱ्यांना त्याचा वर्षभर मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खरीप हंगामापूर्वी संबंधित अपूर्ण पुलाची कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
संबंधित ठेकेदाराकडून पुलाच्या कामांना काही केल्या कसलीही गती मिळत नाही. त्यामुळे अत्यंत रहदारीच्या व वर्दळीच्या मार्गावरील पुलांचे काम गेले वर्षभर रखडले आहे. धोम पाटबंधारे विभागाने गांभीर्याने दखल घेत नाही.
वाई एमआयडीसी शेलारवाडी येथील पूल धोकादायक कारणास्तव एक वर्षापूर्वी पाडण्यात आलेल्या पुलाला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या रहदारीचे पूल अर्धवट अवस्थेत असल्यामुळे एमआयडीसीमधील कामगार व या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याचे संबंधित ठेकेदार व धोम पाटबंधारे विभागास कसलेही सोयरसुतक नाही. नागरिकांनी अनेक किलोमीटरचा वळसा घालून रविवारपेठ मार्गे मांढरदेव रोडने जावे लागल्याने मानसिक त्रास होऊन वेळ व आर्थिक भुर्दंड बसत आहे. एमआयडीसी शेलाखाडी पुलाची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. या पुलावरून परिसरातील दररोज शेकडो कामगार वाई एमआयडीसीमध्ये कामासाठी ये-जा करतात, तर परिसिरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी
अवजारे घेऊन ने-आण करावी लागते. शेतकरी व कामगारांचा त्रास धोम पाटबंधारे व ठेकेदाराला दिसत असूनही कालव्यावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही.
कोट...
गंगापुरी-शेलारवाडीला जोडणारा रस्ता हा रहदारी मुख्य रस्ता असून, एक वर्षापूर्वी धोकादायक म्हणून पाडण्यात आला आहे. पूल मंजूर होऊनही कामात गती नसल्याने काम अपूर्ण आहे. पूल अपूर्ण असल्यामुळे वळसा घालून यावे लागत असल्यामुळे वेळ जाऊन आर्थिक भुर्दंड बसत आहे. तरी लवकरात लवकर काम पूर्ण करावे.
- सदाशिव शेलार, उपसरपंच, शेलारवाडी
कोट...
एमआयडीसी-गंगापुरी या रस्ता महत्त्वाचा असल्यामुळे आमदार मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने रस्ता मंजूर करून निधी ही पडला आहे. रस्ता पूर्ण करण्याची ३१ मार्च, २०२० अंतिम तारीख होती. मात्र, सबठेकेदार पळून गेला व मुख्य ठेकेदार कोणताही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे त्वरित काम पूर्ण करून वाई, एमआयडीसी व शेलारवाडीमधील नागरिकांना दिलासा द्यावा.
- प्रदीप चोरगे, नगरसेवक
२३वाई पूल
गंगापुरी-शेलारवाडीला जोडणारा रस्ता हा रहदारी मुख्य रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा वर्षभर मोठा त्रास सहन करावा लागत आहे.