बारा गावांतील वाहनचालकांची पेट्रोलअभावी गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:36+5:302021-01-17T04:33:36+5:30
खटाव : खटावमधील एकमेव असलेल्या पेट्रोलपंपाची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. खटावसह आसपासच्या बारा गावांतील लोकांच्यादृष्टीने ...
खटाव : खटावमधील एकमेव असलेल्या पेट्रोलपंपाची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. खटावसह आसपासच्या बारा गावांतील लोकांच्यादृष्टीने जवळचा असल्यामुळे या पंपावर नेहमी गर्दी होते. परंतु तेथे महिन्यातून पंधरा दिवस पेट्रोल नसते. अशावेळी दहा किलोमीटरवर पुसेगाव किंवा बारा किलोमीटरवरील वडूजला जावे लागते. यामुळे वाहनचालकांबरोबरच रुग्णांचे हाल होत आहेत.
खटावमधील पंपावर ‘बंद’चा फलक पाहून ग्राहकांना तेलाविना रिकाम्या हातीच परतावे लागते. अशावेळी पेट्रोल, डिझेलसाठी ग्राहकांना वडूज किंवा पुसेगाव या ठिकाणच्या पेट्रोल पंपाकडे बाटल्या घेऊन अन्य वाहनाने जावे लागते. शेतकऱ्यांसह सर्वच वाहनधारकांना इंधन तुटवड्याला वारंवार सामोरे जावे लागत असल्यामुळे ग्राहकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या पंपाच्या संदर्भातील तक्रार करायची तर कोणाकडे अशा द्विधा मनस्थितीत सर्वसामान्य ग्राहक आहेत.
‘या पंपावर खटावसह आसपासच्या गावातून ग्राहकांची वर्दळ असते. हे पाहून या पंप मालकांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खटावची लोकसंख्या पाहता दुसऱ्या पंपाची निविदा निघावी,’ असे मत सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी व्यक्त केले.
१६खटाव-पंप
खटावमधील पेट्रोल पंपावर सातत्याने ‘बंद’चा फलक लागलेला असतो. (छाया : नम्रता भोसले)