साताऱ्यातील आयटीआयच्या परिसरात मतकर कॉलनीला गैरसोयीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:31 PM2017-11-18T12:31:38+5:302017-11-18T12:37:55+5:30
सातारा : येथील आयटीआयच्या परिसरातील मतकर कॉलनी गेल्या कित्येक दिवसांपासून गैरसोयीच्या विळख्यात सापडली आहे. ना नगर पालिका ना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सातारा : येथील आयटीआयच्या परिसरातील मतकर कॉलनी गेल्या कित्येक दिवसांपासून गैरसोयीच्या विळख्यात सापडली आहे. ना नगर पालिका ना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले आहे.
एकीकडे जिल्हा हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून घोषित केले असताना साताऱ्यातील मतकर कॉलनी मात्र या सगळ्या सुविधांपासून वंचित आहेत. या कॉलनीमध्ये पुरेसे शौचालय नाहीत. शौचालयअभावी नागरिकांची कुचंबणा होत आहे.
नागरिक उघड्यावरच शौचास बसत असल्यामुळे आणखी रोगराई वाढण्याची शक्यता आहे. या कॉलनीमध्ये आणखी शौचालयाची गरज असून, नवीन शौचालय बांधण्यात यावीत, अशी मागणी भटक्या विमुक्त जाती-जमाती आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ शिंदे यांनी केली आहे.
या वस्तीमध्ये सार्वजनिक सफाई व गटार सफाई ग्रामपंचायतीमार्फत पुरविली जाते. परंतु ही जागा कुटुंबांच्या मालकीची नसल्याने वैयक्तिक अथवा सार्वजनिक शौचालयाचे प्रस्ताव अथवा सुविधा ग्रामपंचायतीमार्फत दिलेल्या नाहीत. असे शाहूपुरी ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील नागरिक कात्रीमध्ये सापडले आहेत.
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना सुविधा मात्र पूर्वीच्याच आहेत. येत्या काही दिवसांत य सुविधा न मिळाल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.