‘ओव्हरलोड’मुळे अपघातांच्या घटनांत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:53+5:302021-01-04T04:31:53+5:30
औंध : उसाचा हंगाम सगळीकडे सुरू आहे. खटाव तालुक्यात तीन साखर कारखाने जोमाने ऊस गाळप करीत आहेत. त्यापटीत ऊस ...
औंध : उसाचा हंगाम सगळीकडे सुरू आहे. खटाव तालुक्यात तीन साखर कारखाने जोमाने ऊस गाळप करीत आहेत. त्यापटीत ऊस वाहतूकही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवडाभरात औंध परिसरात पाच ते सहा ठिकाणी उसाच्या ट्रॉल्या पलटल्याच्या घटना घडल्या आहेत. ओव्हरलोड ऊस वाहतूक करण्याच्या नादात उसाचे ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटनांत वाढ झाली असून, यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.
औंधसह परिसरात सध्या ऊसशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात तीन कारखाने असूनही इतर ठिकाणच्या कारखान्यांच्या टोळ्याही ऊसतोड करीत आहेत. येथील शेतकरी मोठ्या कष्टाने ऊसशेती करू लागला आहे. ऊसतोडणीसाठी चकरा मारून टोळी आपल्या शेतात पोहोचेपर्यंत शेतकऱ्याचा घाम निघू लागला आहे. यातच आणखी एक धाकधूक त्याला सतावत असते, ती म्हणजे आपला ऊस तोडून कारखान्यात आत जाईपर्यंत व्यवस्थित जावा, कुठेही वाहन पलटी अथवा एखादा अनर्थ घडू नये, याच काळजीत तो असतो.
ऊस वाहतूकदार, टोळीचालक आपले ऊस वाहतुकीचे टार्गेट पूर्ण व्हावे, यासाठी धडपड करीत असतो. यासाठी तो क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करण्याचे धाडस करतो. प्रत्येक वेळेस त्याचा आत्मविश्वास कामी येतोच, असे घडत नसते. मग कुठेतरी झोला बसणे, ऊस बांधलेल्या दोऱ्या निसटणे, चढाला अथवा उताराला ट्रॉली पलटी होणे, अरुंद रस्त्यावरून जाताना अपघात होणे, यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस निम्याच्या वर नुकसानीत जातो. गत आठवड्यात गोपूज पुसेसावळी रस्त्यावर ठिकठिकाणी उसाचे ढीग दिसत होते, तर निम्म्यापेक्षा जास्त ऊस त्यावरून वाहने गेल्यामुळे खराब झाला होता. त्यामुळे ऊस वाहतूक करताना ओव्हरलोड वाहतूक टाळून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, ही माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट..
याबाबत आम्ही तालुक्यातील सगळ्या कारखाना व्यवस्थापनांशी चर्चा करणार आहोत. शेतकऱ्यांचे वारंवार जर ओव्हरलोड वाहतुकीमुळे नुकसान होत असेल, तर त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे.
- दत्तात्रय घार्गे,
खटाव तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
०३औंध
खटाव तालुक्यात गत आठवड्यात उसाची ट्रॉली पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. (छाया : रशीद शेख)