कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:11+5:302021-09-25T04:42:11+5:30

कऱ्हाड : ‘कोरोनामुळे बंद असलेली कुस्त्यांची मैदाने त्यातच वाढत चाललेल्या महागाईने कुस्तीपटूंना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

Increase the honorarium of wrestlers | कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करा

कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करा

googlenewsNext

कऱ्हाड : ‘कोरोनामुळे बंद असलेली कुस्त्यांची मैदाने त्यातच वाढत चाललेल्या महागाईने कुस्तीपटूंना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवंगत हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्या कुटुंबातील विधवा पत्नी, उत्तराधिकारी मुलांना तसेच सध्या हयात असणाऱ्या पैलवानांना महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या मानधनात भरीव वाढ करावी,’ अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात खासदार श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे, मी स्वतः कुस्तीशौकिन असल्याने अनेक दिवंगत हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवानांना ओळखत होतो. तसेच सध्या हयात असणाऱ्यांनादेखील ओळखतो. अनेक महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी मल्ल गावोगावी जत्रेवर भरणाऱ्या कुस्त्यांच्या फडात मला भेटतात. अनेक फडावर हजेरी लावल्यावर गावकरी तसेच कुस्तीशौकिन कौतुक म्हणून वाटखर्ची रूपाने अशा पैलवानांना आदराने सन्मानधन देतात, तसेच त्यांना मानाने वागविण्याची प्रथा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. त्यांच्या खुराकाचा खर्च फडावरच्या लढतीवर मिळणाऱ्या मानधनातून भागविता येत असे.

याशिवाय निवृत्त पैलवान हेच पुढे वस्ताद, प्रशिक्षक म्हणून नवीन पैलवान तयार करतात. मात्र गेली दोन वर्षे ते कोरोनाच्या अडचणीमुळे शक्य झालेले नाही. कोरोना संसर्गामुळे यात्रा, उत्सवातून आयोजित होणारी कुस्त्यांची मैदाने थांबली आहेत. त्यातच महागाई आभाळाला भिडली आहे. परिणामी उत्तराधिकाऱ्यांना आणि हयात मानकऱ्यांना आपले कुटुंब चालविणे अशक्य झाले आहे. ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पैलवानांना खुराक आणि उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे.

आपण अशा सर्व सन्माननीयांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्लांच्या मानधनात भरघोस वाढ करावी, अशी मागणी राज्यातील अनेक मल्ल आणि कुस्ती आखाड्यांमार्फत होत आहे. यासंदर्भात आपणाकडून सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात यावा.

Web Title: Increase the honorarium of wrestlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.