कलेढोण परिसरात भुरट्या चोऱ्यांत वाढ, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडून बंदोबस्ताची मागणी; घरासमोरील बोकडही गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:50 PM2017-12-22T12:50:28+5:302017-12-22T12:56:14+5:30
खटाव तालुक्यातील कलेढोण परिसरामध्ये भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवड्याच्या बाजारादिवशी या चोऱ्यांच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली असते, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण परिसरामध्ये भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवड्याच्या बाजारादिवशी या चोऱ्यांच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली असते, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
कलेढोण हे मध्यवर्ती बाजारपेठचे ठिकाण आहे. याठिकाणी आठवडा बाजारही भरतो. या बाजारात परिसरातील लहान-मोठ्या गावांतून व्यापारी, शेतकरी व कष्टकरी येत असतात. आठवड्यातूनच एकच वेळ सर्व गोष्टी मिळत असल्यामुळे मोठी गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरट्यांनी बाजारात धुमाकूळ घातला आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्याकडेला असणाऱ्या सिंधू रघुनाथ बुधावले यांच्या घराबाहेरील बोकड उचलून नेल्याची घटना घडली. तसेच आठवडा बाजारातून राहुल महाजन, भाईलाल मुलाणी, अमीर मुजावर, बालम मुलाणी व मागील बाजारात अन्य व्यक्तींचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत.
या आठवडा बाजारातून एका महिलेचे दागिने तसेच बाजारासाठी लालेल्यांच्या व व्यापाऱ्यांचे पैसे चोरीला गेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
लहान वस्तूंमुळेच पोलिसांत तक्रार नाही
व्यक्तीचे मोबाईल, पैसे, महिलांचे पर्स, दागिने व इतर जाता-जाता चोरी करता येतील अशा वस्तूंच्या चोरीत वाढ झाली आहे. कोणतीही वस्तू किंवा मोबाईल लंपास तिचा तपास लागत नाही व लहान वस्तू असल्यामुळे कोणी पोलिसांत तक्रार ही करत नाही. त्यामुळे या भुरट्या चोरांचे व चोरीचे प्रमाणही वाढले आहे.