आशादायक! सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी पातळीत वाढ, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:06 PM2023-02-23T18:06:40+5:302023-02-23T18:07:04+5:30
जलसंधारणाची किमया दिसून आली
नितीन काळेल
सातारा : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होणे आणि पाणी उपसा वाढल्याने भूजल पातळीत घट होत चालली आहे. जानेवारीतील तपासणीतच पाटण आणि महाबळेश्वर या अतिवृष्टीच्या तालुक्यांतच पाणीपातळीत घट झाली आहे, तर दुसरीकडे आशादायक बाब म्हणजे माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतील पातळीत वाढ झाल्यामुळे जलसंधारणाची किमया दिसून आली आहे. तरीही पाणी उपशामुळे संकट ओढवू शकते.
जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात निश्चित केलेल्या विहिरींची पाणीपातळी मोजण्यात येते. त्यासाठी दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिन्यांत याची तपासणी होते. जिल्ह्यात एकूण निरीक्षण विहिरींची संख्या १०६ आहे. यावर्षीही जानेवारी महिन्यात या निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासण्यात आली. यामध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत एकूण ५० विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याचे समोर आले. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात ७, खंडाळा २, खटाव ४, कोरेगाव तालुका ४, माण ६, महाबळेश्वर तालुका २, पाटण ७, फलटण तालुका ८, सातारा ५ आणि वाई तालुक्यातील ५ निरीक्षण विहिरींत घट आढळली. यामध्ये जावळी तालुक्यात मात्र विहिरीत घट आढळून आलेली नाही.
गेल्यावर्षीचा विचार करता यंदा भूजल पातळी आणखी खालावल्याचे दिसून आले. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यातील नोंदीनुसार फक्त ४१ विहिरींत घट आढळली होती. यामध्ये फलटण तालुक्यातील सर्वाधिक १० निरीक्षण विहिरींचा समावेश होता, तर यानंतर पाटण आणि खटाव, कऱ्हाड तालुक्यांचा समावेश होता. यंदा घट होणाऱ्या विहिरींची संख्या वाढली आहे.
खटावमध्ये सर्वांत वर पाणी
जिल्ह्यात ११ तालुके आहेत. जानेवारीत तपासणी केल्यानंतर खटाव तालुक्यात भूजल पातळीत पाच वर्षांच्या तुलनेत ०.७३ मीटरने वाढ झाल्याचे दिसून आले. माण ताुलक्यात ०.५५ मीटरने वाढ आहे. तसेच वाईत ०.०६, कोरेगाव तालुका ०.३६, खंडाळ्यात ०.०६ मीटरने भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले.
कोणत्या तालुक्याची भूजल पातळी किती (मीटरमध्ये)
तालुका -निरीक्षण विहिरी -जानेवारी पातळी - २०२२ मधील
जावळी - ०१ - ०.१० - ०.१४
कऱ्हाड -१५ - ०.०५ - ०.४२
खंडाळा -०५ - ०.०६ - ०.२२
खटाव -१७ - ०.७३ - १.०२
कोरेगाव - ०९ - ०.३६ -०.७०
माण -१६ - ०.५५ - ०.५८
महाबळेश्वर -०३ - ०.२३ - ०.१२
पाटण - १० - ०.५७ - ०.०७
फलटण - १२ - ०.०४ - ०.८५
सातारा - १० - ०.०३ - ०.५५
वाई - ०८ - ०.०६ - ०.९६
वाढ दिसते, पण तुलनेत पातळी कमी
जिल्ह्यातील माण, खटावसह काही तालुक्यांत पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीत वाढ दिसून येत आहे. ही वाढ वाॅटर कपमधील कामे तसेच जलसंधारणामुळे झालेली आहेत. मात्र, पिके आणि फळबागांसाठी आज मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे. यामुळे पाणीपातळी वाढत असल्याचे दिसले तरी त्यामध्ये हळूहळू उतार येत चालला आहे. हे मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीची तपासणी जानेवारी महिन्यात करण्यात आली. यामध्ये ५० विहिरींत घट, तर ५६ मध्ये वाढ दिसली. तसेच तालुक्यांच्या विचार करता पाटण आणि महाबळेश्वरमध्ये घट आहे. सरासरी पर्जन्यमान कमी असल्याने या दोन तालुक्यांत अशी परिस्थिती असू शकते. - डब्लू. जे. बनसोडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा